लोकमान्य



                                                                     *लोकमान्य*
     आज लोकमान्यांची १६० वी जयंती.त्याचसोबत टिळकांनी जी  सिंहगर्जना केली होती,तीला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!' हीच ती अचूक सिंहगर्जना.जी मूळ टिळकांनी इंग्रजीत केली होती,'swrajya is my birthright and I shall have it !'
        लोकमान्य हे खरच एक युगपुरुष होते.त्यावेळच्या तरुणांचे 'हिरो' होते.टिळकांच्याच मार्गदर्शनातून चापेकर,सावरकर,यांच्यासारखे क्रांतिकारक पुढे आले.टिळकांच्या जीवनाचा आढावा घेतल्यास एक लक्षात येतं की त्यांचा संपूर्ण प्रवास हा अनेक अडथळ्यांनी भरलेलं होतं.१८५६ मध्ये जन्मानंतर लगेचच पुढच्या वर्षी झालेल्या १८५७ च्या उठावाचा परिणाम प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष तरी झाला होता यात काहीच शंका नाही.टिळक लहान होते तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला,तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना वडील गेले,ऐन उमेदीत मित्र,अनेक स्नेही दुरावले,तब्बल तीन वेळा झालेला तुरुंगवास,अशा अनेक प्रसंगांना टिळकांनी तोंड दिलंय.वडिलांकडूनच त्यांच्यात प्रचंड बुद्धिमत्ता आलेली होती.बालपणापासूनच टिळकांचं संस्कृत,गणित या विषयावर प्रभुत्व होते.त्यांनी महाविद्यालयीन जीवनात अनेक संस्कृत कविताही केल्या होत्या.याच्याच बळावर टिळकांनी केसरीमध्ये अनेक अग्रलेख लिहिले होते.'ज्यांचं गणित चांगलं असतं त्यांचं जीवनाचं गणित कधीच चुकत नाही,कारण त्याचे पुढचे आडाखे पक्के असतात'.टिळकांचं अगदी तसच होतं.
    टिळक हे प्रभावी वक्ते,कुशल राजकारणी होते आणि याच्याच जोरावर त्यांनी उभा महाराष्ट्र जिंकून घेतला होता.ब्रिटीशांच्यावर तर ते केसरीतील लिखाणाच्या माध्यमातून सडकून टीका करत,त्या ब्रीतीशांनाही टिळक पचवणं जड गेलं.सततच्या टीकेने इंग्रज त्रस्त झाले होते.त्या काळी क्रान्तीकारकांमध्येही दोन गट पडले होते.जहाल आणि मवाळ.टिळक हे जहाल पक्षाचे होते.टिळकांच्या आग्रलेखांच्या मथळ्यांवरून तर सहजपणे त्यांची जहालता लक्षात येते.सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का,राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे,देशाचे दुर्दैव,असे एकापेक्षा एक परखड लेखांतून त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.जेथे सरकारचं चांगलं काम दिसलं तिथे त्यांचं कौतुकच केलं पण चुकीच्या ठिकाणी टीकाच आणि ती सुद्धा मिळमिळीत नाही तर डोक्याला झिणझिण्या आणणारी.यातूनच मग टिळकांना सरकारच्या रोषाला सामोरं जावं लागलं.एकूण तीन वेळा तुरुंगवास त्यातही दोन राजद्रोहाच्या शिक्षा आणि त्यातील एक तुरुंगवास तर ६ वर्षांचा,वयाच्या ५२व्या वर्षी! त्यात अनेक दुर्धर अशा व्याधींनी ग्रस्त.या शिक्षेतून टिळक सुटले वयाच्या ५८व्या वर्षी.सुटून आल्यानंतर तर ते पुर्ण अशक्त झाले होते.महाविद्यालयाचे पहिले वर्ष केवळ व्यायामासाठी घालवून कमावलेले शरीर,ते सुटकेनंतर अक्षरशः खंगून गेलं होतं.माझ्यामते,या ६ वर्षांच्या तुरुंगावासाने टिळकांची किमान २० वर्षे गिळली.टिळक जर १९२० नंतर पुढे १५ वर्षे जरी जगले असते तरी आपला देश हा अहिंसेच्या 'विषाणूपासून' वाचला असत.कदाचित आपल्या देशाने १९४७ पूर्वीच स्वातंत्र्य मिळवलं असतं.
    टिळकांचं ज्याप्रमाणे संस्कृत भाषेवर प्रभूत्व होतं त्याप्रमाणे त्यांचा भगवद्गीतेचाही गाढा अभ्यास होता.टिळक आणि स्वामी विवेकानंदांची भेट झाल्यानंतर त्यांचे हे गुण जुळले.दोघांनाही संस्कृत प्रिय,दोघांचाही भगवद्गीतेचा गाढा अभ्यास.दोघांनाही देशाविषयी नितांत आदर होता.टिळक खरंतर गीता जगले.यातूनच त्यांनी गीतेवतील टीकात्मक असा 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला.टिळक कोण नव्हते,ते उत्तम वक्ते होते,कुशल राजकारणी होते,लेखक होते,कवी होते,गणिती होते,समाजसेवक होते,आदर्श संपादक होते.
   लोकमान्यांच्याच एका आग्रलेखाच्या शीर्षकाप्रमाणे खरच आपल्या 'देशाचे दुर्दैव'च म्हणावे लागेल की आम्ही टिळक,सावरकरांसारख्या महामानवांना जातीयवादी ठरवून मोकळे झालो.ते आपल्यासारखेच माणूस होते,त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात हे समजूनही न घेणाऱ्यांची खरोखरच कीव करावीशी वाटते.नाही म्हणायला प्रत्येकाकडे सदसदविवेकबुद्धी असते,पण विचार कोण करतो? कोणताही अभ्यास नाही,वाचन नाही,चिंतन तर नाहीच नाही.मी शहाणा असे म्हणून क्रांतिकारकांना कायम शिव्याच घालणारे लोक सर्वत्र आढळतात.पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की इतिहासाशी कृतघ्न राहणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करत नाही!!!
                               ***
 अभ्यासकांसाठी टिळकांविषयी प्रसिद्ध असलेले काही ग्रंथ –
१)समग्र लोकमान्य टिळक : खंड १ ते ८
२)लोकमान्य टिळक यांचे चरित्र : न.चि.केळकर – खंड १ ते ३
३)लोकमान्य : प्रा.न.र.फाटक
४)दुर्दम्य : गंगाधर गाडगीळ
५)लोकमान्य टिळक : धनंजय कीर
६)लोकमान्य टिळक यांची गेली आठ वर्षे : अप्पाजी विष्णू कुलकर्णी
७)लोकमान्य टिळक : ggग.प्र.प्रधान
८)लोकमान्य टिळक : ना.सी.फडके
९)हाक आभाळाची : श्री.ना.पेंडसे
१०)मंडलेचा राजबंदी : अरविंद व्यं. गोखले        

Comments