लोकमान्यांच्या सौभाग्यवती- सत्यभामाबाई टिळक

       देशभक्त क्रांतीकारकाने विवाह करून केलेला संसार कधीच मनाजोगता केला जात नाही, कारण तो क्रांतिकारक अखंड देशाचा संसार सांभाळण्यात रात्रंदिन कार्यरत असे.घरात असलेली स्त्री ही बऱ्याचदा घरातील वडील मंडळींनी आपला मुलगा लग्नाच्या वयाचा झाला आहे आणि आता त्याचे दोनाचे चार व्हावेत या इच्छेखातर त्याचे प्राथमिक/ माध्यमिक शिक्षण चालू असतानाच लग्न लाऊन दिले जात असे.शाळेमध्ये जाणारा मुलगा अविवाहित आहे असे अगदी अपवादात्मक उदाहरण दिसत असे.त्या काळात बहुतांशी प्राथमिक शाळेतील मुलांची लग्नेही झालेली असत आणि माध्यमिक वर्गांमध्ये गेलेले कित्येक तर बापही झालेले असत.त्यामुळे घरातील वडीलधाऱ्या मंडळींना सुदैवाने समजा जास्त आयुर्मान लाभलंच तर त्यांना एकाच घरात मुलगा, नातू, पणतू अश्या चार पिढ्या बघायला मिळत असत.

    गंगाधरपंत टिळक उर्फ नाना हे अत्यंत हरहुन्नरी व्यक्तिमत्व.प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर ते स्वतःच्या जीवावर पुण्याला गेले होते, अशातच त्यांच्या आईचे रमाबाईंचे निधन झाले आणि वडील रामचंद्रपंत आपल्या मुलीचे लग्न लाऊन देऊन, दुसऱ्या बाजीरावाच्या भावाचे कुटुंब रहात होते त्या ठिकाणी बांदा जिल्ह्यातील चित्रकुट येथे निघून गेले त्यामुळे गंगाधरपंतांना शिक्षण आणि पर्यायाने पुणे सोडून परतावे लागले.त्यानंतर त्यांनी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी केली,नंतर रत्नागिरीतील शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.ते स्वतः संस्कृतचे उत्तम जाणकार होते, ज्योतिषाचेही ज्ञान त्यांच्याकडे होते.

 या अश्या व्यक्तीची पत्नी पार्वतीबाई टिळक यांच्यापोटी २३ जुलै १८५६ साली बाळ गंगाधर टिळक या व्यक्तीचा जन्म झाला.बाळ उर्फ बळवंतराव १५ वर्षांचे होईपर्यंत त्यांच्यावर गंगाधरपंतांनी उत्तम संस्कार केले.त्यांच्यामुळेच टिळकांना संस्कृत, गणित आणि विशेषतः गीतेची आवड निर्माण झाली.मुलगा १५ वर्षांचा झाला अर्थातच लग्नाच्या वयाचा आणि मुलीही सांगून येत होत्या.बाळ सहावीत असताना म्हणजेच त्याच्या वयाच्या १५ व्या वर्षी १८७१ साली गंगाधरपंतांनी बनारस येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांशी विचारविनिमय करून बाळचे लग्न ठरवले. त्यांची प्रकृती या काळात ढासळलेली असल्यामुळे आपल्या मुलाचे लग्न डोळ्यादेखत पाहणे हेच प्रापंचिक कार्य त्यांच्यासाठी राहिले होते.१८७१ च्या मे महिन्यात स्वगृही जाऊन त्यांनी आपल्या मुलाचे, बाळचे लग्न उरकले.वधूच्या घराचे मूळ आडनाव महाजन होते परंतु त्यंना बाळ असे म्हटले जात असे.दापोली तालुक्यातील लाडघरच्या बाळ घराण्याचे हे स्थळ बाळ टिळक यांच्यासाठी निश्चित झाले.बल्लाळराव बाळ यांची कन्या तापी, वय वर्षे १०, ही लग्न होऊन टिळक घराण्यात प्रवेश करती झाली.मातृविहीनात्व हे समान व्यंग होते.बाळांच्या घराण्यात समृद्धी नांदत होती.खानदानीपणा तर होताच पण त्यासोबत औदार्य ही मोठे होते.अशा या घराण्यातील तापी अंगापिंडाने बाळ गंगाधर टिळकांपेक्षा चांगलीच सुदृढ होती.तापी लग्न होऊन टिळक घराण्यात आली आणि सत्यभामा झाली.पत्नी प्रकृतीने अगदी सुदृढ आणि दणकट तर बळवंतराव टिळक अशक्त प्रकृतीचे हा त्यांच्या वर्गातील मित्रांच्या थट्टेचा विषय असे. बळवंतराव टिळकांचे लग्न गंगाधरपंतांनी मे १८७१ मध्ये लावलं आणि ३१ ऑगस्ट रोजी त्याचं निधन झालं आणि टिळकांचे पितृछत्र हरपले.तरीही बळवंतराव टिळकांना योग्य मार्गी लावूनच वडिलांनी हे जग सोडले होते.आता पुढची त्यांची जबाबदारी काका गोविंदराव टिळकांनी घेतली.

    सत्यभामाबाई स्वभावतःच अत्यंत शांत आणि संयमी असल्यामुळे आपल्या अबोल असणाऱ्या पत्नीची फारशी चाहूल टिळकांना लागत नसे.शिक्षण पूर्ण झाले, न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी टिळक आणि सहकाऱ्यांनी पुढे पुढे केली.नंतर टिळकांचे राजकीय आणि क्रांतिकारी जीवन सुरु झाले.या काळातही टिळक घरच्या मंडळींसह कमी आणि कामातच जास्त असत.त्यामुळे सहाजिकच पत्नीकडे दुर्लक्ष होत गेले.कालांतराने मुलं झाली. २ मुलांचा मृत्यू टिळकांनी स्वतःकडे असलेल्या धैर्याने पचवला. परंतु हे दोन्ही आघात सत्यभामाबाइंसाठी पचवायला सोपे नव्हते.सतत कामात राहणारा पती, त्याकडे कधी आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या असेही त्यांना कधी वाटले नाही.त्याचमुळे पत्नी सुशील,शांत आणि मुळे आज्ञाधारक असल्यामुळे टिळकांना कौटुंबिक अडचणी फारशा जाणवल्या नाहीत. टिळक आपल्या मुलांच्या किंवा इतर व्यक्तींच्या देखतही पत्नीशी फारसे बोलत नसत.सत्यभामाबाईनी सुद्धा कधी तसा प्रयत्न करून पाहिला नाही.बाईंचा पेहरावही अगदी साधा असे.कमीत कमी किमतीची लुगडी, खण, असा कपडालत्ता असे.उभ्या आयुष्यात त्यांनी क्वचितच आपल्या घरचा उंबरा ओलांडला होता.पतीला कोणतीही कमी भासू द्यायची नाही, मुलांचा सांभाळ करत रहायचा, घरच्या मंडळींच्या व्यतिरिक्त इतर लोकांशी फारसे बोलणे नाही, हाच त्यांचा दिनक्रम बनून गेला होता.घरी घरकामाला गडी किंवा आचारी नसे, क्वचितच एखादी स्वयंपाकीण असे, तिच्याशीही बोलणे कमीच.बाहेरच्या ओटीवर बसून एखाद्या दुसऱ्या स्त्रीसोबत बोलतानाही कोणी त्यांना पाहिले नव्हते. घरी टिळकांचे भाचे धोंडोपंत विद्वांस रहायला होते, त्यांच्यासमोरही टिळक पत्नीशी फारसे कधी बोलत नसत.पण, सत्यभामाबाईंनी घर मात्र चोख राखले होते, टिळकांच्या देशसेवेच्या आड घारातल्या गोष्टी येणार नाहीत याची त्या सदैव दक्षता घेत असत.
लोकमान्यांच्या घरातील स्त्री वर्गाचं डिपार्टमेंट सत्यभामाबाईच सांभाळत. घरातील मूली आणि लहान मुलं यांचा बऱ्याचदा संबंध वडिलांशी न येता आईकड़ेच येत असे. बऱ्याचदा टिळकांकडे कधी कोणी बायका सल्ल्यासाठी आल्या, तर सत्यभामाबाई पहिले त्यांची समजूत काढत, त्यांना शांत करत, सर्व गोष्टी समजून घेऊन मगच त्यांना टिळकांकडे पाठवत असत. लोकमान्यांचे एक मात्र वैशिष्ट्य वेगळे होते की ते सिंहगडावरच्या आपल्या बंगलीवर हवापालटासाठी जेव्हा जात तेव्हा सहकुटुंब जात असत. तेथे तेथे बऱ्याचदा त्यांचे ग्रन्थ लेखन होत असे. सिंहगडी असतांना तत्रस्थ बायका ज्या होत्या, त्यांना सत्यभामाबाईंनी शिवणकाम वगैरे शिकवून उत्पन्नाचा एक मार्ग लावून दिला होता. आपल्या पतीच्या समाजकार्याला आपल्या परीने जमेल तसा हातभार लावण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असे.

    ज्याप्रमाणे टिळकांना मधुमेहाने ग्रासले होते तसेच त्यांच्या पत्नीलाही मधुमेहाची तीव्र व्यथा होती. हे टिळक जाणून असल्यामुळे ते मंडालेहून पाठवलेल्या पत्रांमध्ये सतत विचारपूस करत.१९०८ साली टिळकांना ६ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि मंडाले येथे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले.त्यानंतर पुढची ४ वर्षे सत्यभामाबाई जगल्या.आपल्या पतीला झालेल्या हद्दपारीमुळे त्यांनी स्वतःला कोंडून घेतले होते.स्वयंपाकघर, देवघर, शयनकक्ष याच ठिकाणी त्यांचा वावर असे.एखाद्या साध्वीप्रमाणे त्या जगल्या असे वर्णन त्यांचे नातू ग. वि. केतकर यांनी केले आहे. या चार वर्षांत आजी ( सत्यभामाबाई) घराच्या बाहेरही पडल्या नाहीत. काळ्या बांगड्या, काळेच जाडेभरडे वस्त्र त्यांच्या अंगावर असे. मंगळसुत्राशिवाय इतर कोणताही अलंकार त्यांच्या अंगी नसे.त्या एखाद्या संयाशिणीसारख्या भासत होत्या.साधी राहणी, साधच जेवण, त्यामध्ये पक्वान्ने कधीच खाल्ली नाहीत. नेहमी उपवास करीत असत व उपवासाचे पदार्थ खाऊन रहात असत त्यामुळे प्रकृतीला आराम असा काही मिळत नसे.आपला पती काही सहा वर्षानंतर परत येत नाहीत अशी मनाची समजूत करून घेतल्यामुळे त्यांनीही जगण्याची आशा सोडली होती आणि आपणही आता हा इहलोक सोडून जाणार असे त्या म्हणत. मुली शिकलेल्या होत्या, त्या आपल्या आईला म्हणजे सत्यभामाबाईंना केसरी वाचून दाखवीत असत परंतु त्याकडेही त्यांचे लक्ष नसे. जगण्याची आसक्तीच सुटल्यामुळे त्या नंतरच्या काळात औषधे घेण्याचेही टाळू लागल्या.चेहऱ्यावर दुखाच्या रेषा वाढत होत्या. मधुमेह बळावला होता. त्यासंबधी उपाय टिळक तळमळीने सुचवीत आणि ही काळजी ते मंडाले येथे असताना वाहत होते.पाठवलेल्या पत्रांमधून पत्नीच्या प्रकृतीची ते तळमळीने विचारपूस करत असत. क्रांतिकारक असले तरी त्यांना गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांची जाण होती.टिळक मंडालेला असताना ताईमहाराज प्रकरणाचा प्रतिकूल निर्णय आला आणि या निर्णयाचे दुख सत्यभामाबाई करतील हे लक्षात घेऊन टिळकांनी मंडालेहून त्यांच्यासाठी उपदेशपर पत्र लिहिले होते. यातून त्यांच्या मनात पत्नीबद्दल फारशी उठावदारपणे दिसून न येणारी सुकुमार भावना दिसून येते. अशा या साध्वी स्त्रीचे ७ जून १९१२ रोजी निधन झाले.

    पत्नीच्या निधनाची बातमी कळल्यानंतर लिहिलेल्या पत्रामध्ये टिळकांचे पहिलेच वाक्य होते , ‘’पाठवलेल्या तारेतील मजकूर प्रचंड आणि जोरदार आघात करणार होता. माझ्या दुर्दैवांना मी शांतपणे सामोरा गेलो परंतु या घटनेने कमालीचे हादरविले आहे. आपल्या मनातील श्रद्धांचा विचार करता पत्नीचे पतीआधी निधन होणे इष्ट नाही.तिचे अंत्यसंस्कार यथायोग्य पूर्ण करा.तिच्या अस्थी बनारस किंवा अलाहाबाद अथवा तिच्या इच्छित स्थळी विसर्जित करा. ती जिवंत असताना मी तिच्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे लवकरच तिच्या इच्छा अक्षरशः पूर्ण करा. तिच्या अंतिम प्रसंगी मला जबरदस्ती दूर रहावे लागते आहे याचे सर्वाधिक दुःख होते आहे.माझ्या आयुष्यातील एक पर्व संपले आणि दुसरे संपायला वेळ लागणार नाही.’’

सत्यभामाबाई किती धीराच्या होत्या याबद्दल कृ. प्र. खाडिलकरांनी एक आठवण लिहून ठेवली आहे.१९०८ साली साली टिळकांना दुसर्या राजद्रोहाची शिक्षा झाल्याचे वृत्त सांगण्यासाठी ते गायकवाड वाड्यात गेले होते.त्या वेळी ते दाराच्या जवळच डोळे पुसत बसले होते.रखवालदाराने ही खबर बाईंना जावून सांगितली. हे ऐकताक्षणी त्या कारण ओळखून बाहेर आल्या.खाडिलकरांची ती आवस्था बघून त्या म्हणाल्या, ‘तिकडे शिक्षा झाली हे सांगण्यासाठीच तुम्ही येथे आलात ना ? मग बायकांसारखे रडत काय बसलात ? शिक्षा काही चोरी, लबाडी सारख्या नीच गुन्ह्यासाठी झालेली नाही. लोकांच्या कल्याणासाठी झटण्याला गुन्हा ठरवून सरकारने शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे हातपाय गाळून बसण्यात काय हाशील ? उठा, रडू नका, कामाला लागा.’’
सत्यभामाबाई आपल्या पतीच्या कार्याशी किती एकरूप झाल्या होत्या. अश्या कणखर पतीच्या संगतीत राहून सत्यभामाबाईंचा स्वभावही तसाच झाला होता हे लक्षात येते.

संदर्भ-
लोकमान्य टिळक चरित्र - धनंजय कीर
लोकमान्य टिळक चरित्र - न र फाटक

Comments

  1. फार सुंदर लेख आहे.

    ReplyDelete
  2. सत्यभामाबाई यांची ओळख करून देणारी कादंबरी "सत्यभामा" नुकतीच प्रकाशित झाली आहे. प्रस्तावना लो. टिळक यांचे पणतू डाॅ. दीपक टिळक यांची आहे. ही कादंबरी अवश्य वाचावी. लेखक : डाॅ. श्रीनिवास आठल्ये, डोंबिवली (९२२३३७४३००)

    ReplyDelete

Post a Comment