लोकमान्य आणि स्वदेशी-बहिष्कार


      
   *लोकमान्य आणि स्वदेशी-बहिष्कार तंत्र*
 
 ‘अमेरिकेत ज्याप्रमाणे बहिष्कार योगाच्या विरुद्ध बोलणाऱ्यास स्वदेशाचा शत्रू मानतात,अगदी तशाच प्रकारचे लोकमत आपल्याला तयार करावे लागेल. स्वदेशीचा शत्रू आणि स्वदेशाचा शत्रू यात काहीही भेद नाही.रा.खापर्डे म्हणतात त्या प्रमाणे स्वदेशीचा शत्रू अस्सल स्वदेशी नव्हे,असेही म्हणण्यास काही हरकत नाही आणि असे म्हटल्याने जर कोणास चीड येणार असेल, तर याबद्दल आम्हास वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्यासाठी हा प्रयत्नच नाही असे त्यांनी खुशाल समजावे !’’

   ६ ऑगस्ट १९०७ साली लिहिलेल्या आग्रलेखामधील या ओळींमधून लोकमान्यांची स्वदेशी प्रीत्यर्थ असलेली तळमळ आणि आग्रह हे किती तीव्र पातळी चे होते ते सहज लक्षात येईल.लोकमान्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जो कोणता उपक्रम किंवा चळवळ हाती घेतली ते उत्कट अशा भावनेतून आणि तीव्र अशा जाणीवेतून सिद्धीस नेले.साधारण १९०५ च्या अलीकडच्या काळात नजरेच्या टप्प्यात असलेली बंगालची फाळणी आणि भारतात वाढत असणारे विदेशीचे मालाचे प्रमाण या गोष्टींबाबत लोकमान्यांनी एकत्रित असा तोडगा काढला ज्यातून पुढे अखंड हिंदुस्थान सर्वच बाजूने कार्यक्षम बनला.तो तोडगा म्हणजे त्यांनी मांडलेली चतुःसूत्री.राष्ट्रोन्नती साधण्यासाठी आणि जनतेला सक्रीय करण्यासाठी मांडलेल्या चतुःसुत्रीचे स्वातंत्र्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय किंवा स्वभाषेत शिक्षण हे चार घटक होते.ही चतुःसूत्री बंगालने अक्षरशः जशीच्या तशी उचलून उपयोगात आणण्यास प्रारंभ केला होता.आणि महाराष्ट्रात टिळकांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हीच चतुःसूत्री सर्वत्र पोहोचवून जास्तीत जास्त लोक कसे स्वीकारतील हे बघत होते.यामध्ये लोकांच्या जास्त हिताचे आणि जवळचे असे मुख्य दोन घटक होते ते म्हणजे स्वदेशी आणि बहिष्कार.

    आपल्याकडे ब्रिटीशांची हुकुमत खऱ्या अर्थाने सुरु झाली आणि वाढीस लागली ती १८५७ च्या समरानंतर.या वेळी आपली हार आणि इंग्रजांची जीत हे  निमित्त त्यांचं प्रस्थ पसरण्यासाठी पुरेसं होतं.याचे परिणाम असे झाले की भारतियांचं स्वतःचं जे काही होतं ते क्षणात परकं झालं.इंग्रजांनी इंग्लंड मधील व्यापारी, कारागीर, येथे आणून इथले धंदे जाणूनबुजून बुडवले.स्थानिक नागरिक हे कायमचे ग्राहक झाले आणि परदेशी व्यापारी/गिरणी मालक हे कायमचे मालक बनले.या व्यापाऱ्यांच्या हाताखाली राबू लागले ते हिंदुस्थानी मजूर.फुकटात किंवा नाममात्र पगारात मिळणारा नोकर कुणाला नको असतो,इंग्रजांनी दाखवलेल्या आमिशाला लोक सहज फसत गेले आणि फक्त तेच केवळ स्वदेशी होऊन राहिले,येथील लोक सोडल्यास त्यांसंबंधी कोणतीच गोष्ट भारतामध्ये स्वदेशी नव्हती.अशा परिस्थितीत काही लोक हे टिपीकल नोकरदार  बनलेले नव्हते,त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागृत होतं.यांच्यापैकी एक होते ते म्हणजे गणेश वासुदेव जोशी.२ एप्रिल १८७० रोजी  गणेश वासुदेव जोशी आणि सदाशिवराव गोवंडे यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली.सार्वजनिक गोष्टींमध्ये ज्या ज्या ठिकाणी सरकार कमी पडत आहे त्या त्या ठिकाणी सरकारला ते दाखवून देणे,सार्वजनिक कामांमध्ये हातभार लावणे अश्या सामाजिक आशयाचे उपक्रम आणि कार्य सार्वजनिक सभा करत असे. गणेश वासुदेव जोशी यांचे सार्वजनिक कार्य बघून लोक त्यांना ‘सार्वजनिक काका’ असच म्हणू लागले.या स्व्क़्देशीचा स्वीकार करून,स्वदेशीची शपथ घेऊन तिचा प्रसार करणारे सार्वजनिक काका हे पहिले पुढारी होते.१८६९ पासून त्यांनी पूर्णपणे स्वदेशीचे व्रत अंगिकारले होते.त्यांचे धोतर,अंगरखा आणि पागोटे हे सारे घरी चरख्यावर सुत कातून विणलेले असे(चरख्याचा संबंध आपल्याला माहित आहे त्याहीपूर्वी होता हे यातून दिसून येते).सार्वजनिक काकांकडून प्रेरणा घेतली ती पुढे वासुदेव बळवंतांनी.वासुदेव बळवंत फडके यांना जेव्हा समजलं की आपल्या हाती असलेल्या छत्रीचं कापड मॅनचेस्टरहून येतं म्हणजेच ते विदेशी आहे , तेव्हापासून त्यांनी विदेशी कापडाची छत्री वापरणं बंद केलं.याचेच संस्कार झाले ते लोकमान्यांवर.

   लोकमान्यांचे स्वदेशीचे बरेच किस्से प्रसिद्ध आहेत.त्यांना पसंत नसलेले बॅडमिंटन,क्रिकेट सारखे विदेशी खेळ. ते खेळत असताना खेळू नये म्हणून खेळणाऱ्या आपल्या मुलाला आणि मुलासोबत खेळणाऱ्या न.चिं. केळकर यांना त्यांच्याकडून बसलेला ओरडा.गोपाळराव गोखले हे टिळकांचे राजकीय आणि वैचारिक शत्रू,गोखल्यांना कोंडीत पकडण्याची ते एकही संधी सोडत नसत.आवड म्हणून गोखले युरोपियन लोकांसोबत क्रिकेट खेळतात हे जेव्हा समजले तेव्हा टिळक खोचकपणे म्हणाले होते की, ’हे आमचे गोपाळराव, चेंडू-दांडी चा खेळ बाकी उत्तम खेळतात’.

   सुरवातीपासूनच लोकमान्यांचा स्वदेशी च्या पुरस्कारावर जास्तीत जास्त भर दिसून येतो.१८९६ साली मुंबई,पुणे,सातारा,नागपूर,अमरावती येथे टिळकांच्या सभा झाल्या आणि तिथे त्यांनी लोकांना स्वदेशी कापड वापरण्याच्या शपथा घेण्यासाठी प्रवृत्त करणारे ठराव संमत केले.आणि यामध्ये टिळकांनी २० वर्षांपूर्वी स्वदेशीची शपथ घेणाऱ्या सार्वजनिक काकांचे उदाहरण दिले होते.परंतु आपल्याकडे कोणी चांगली गोष्ट करावयास गेले की त्यावर अविचारी किंवा अर्धविचारी टीका करणारे बरेच असतात,त्यापैकी एक होते काँग्रेस पुढारी आणि अर्थतज्ञ दिनशा वाच्छा.वाच्छा यांनी टिळकांच्या स्वदेशी विषयी अशी टीका केली की ‘सर्वांना पुरेल असे कापड भारतात तयार होत नाही,त्यामुळे ही मागणी अव्यवहार्य आहे, तुम्ही म्हणाल म्हणून लगेच उद्या कोणी स्वदेशी वापरू लागेल असे अजिबात नाही.’ खरेतर ही टीका किंवा हा विरोध अगदीच अनाठायी होता,पण त्यालाही टिळकांनी उत्तर तसेच न देता व्यवस्थित अर्थपूर्ण दिले.टिळक म्हणतात की, ‘इंग्लंड देशात जे जे धंदे निघण्यासारखे होते ते बहुतेक सुरु होऊन तो देश भरभराटीस आल्यामुळे अप्रतीबंधक व्यापाराखेरीज त्याला तरणोपाय नाही.पण जर्मनी,अमेरिका सारख्या व्यापारात मागासलेल्या देशांनी इंग्लंड देशातील अर्थशास्त्र सर्वथा मान्य न करता आपापल्या देशात जेवढे उद्योगधंदे निघतील तेवढे काढण्यावर लक्ष लाविले आहे.’, ‘देशी कपड्याकरिता कितीही चळवळ झाली,सभा झाल्या,तरी हिमालयापासून सेतुबंधापर्यंत हिंदू, मुसलमान, पारशी  वगैरे लोक उद्या देशी कापड वापरण्यास लागतील असे नाही.या गोष्टी घडून येण्यास काही काळ जावा लागेल.देशी कापड वापराबाबत चळवळ जसजशी जास्त पसरेल, त्या मानाने देशी मालास जास्त मागणी येईल आणि तशी मागणी आली की आज जो माल येथे होत नाही तो तयार करण्याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष जाईल.यातून चांगला कापूस पिकवण्याची तजवीज होऊन गिरण्यांची संख्याही वाढू शकते’. ‘अर्थशास्त्रातील सूत्रानुसार, मागणी वाढली की पुरवठा वाढतो,पुरवठ्यासोबत किमतीही वाढतात,जसजसा मालाचा खप वाढेल तश्या किमतीही मूळ पदावर येतील.’ ‘यामध्ये किमती वाढून कारखानदारांस जो फायदा मिळतो तोच फायदा हे कारखानदार सदर स्वदेशी कारखाने वाढवतील आणि देशातल्या देशात जास्त माल निघू लागला तर पुन्हा किमती कमी होऊन व्यापाराचे समीकरण नीट बसेल’.(स्वदेशीवरील आक्षेप,  अग्रलेख, १२ डिसेंबर १९०५ )

   स्वदेशीबाबत लोकमान्यांनी भूमिका अगदीच स्वीकारार्ह होती हे यातून दिसते.१७ मार्च १८९६ सालच्या अग्रलेखामध्ये टिळक एक अगदी उपयुक्त सूचना करतात.स्वदेशी आणि बहिष्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्यांनी यात मांडलं आहे.त्यात ते म्हणतात की, ‘ मुंबईच्या व्यापाऱ्यांनी विलायती कापड आणायचे नाही असा निश्चय करून काही भागायचे नाही, कारण हिंदू व्यापाऱ्यांनी माल नाही आणला, तर मुसलमान व्यापारी आणतील आणि त्यांनीही नाही आणला तर मॅनचेस्टरचे लोक आपले व्यापारी पाठवून येथे दुकाने टाकतील.या करिता विलायती मालाचे गिर्हाईक कमी करणे हीच तो माल आमच्या देशात न येण्याची पहिली पायरी होय’. किती सोप्या पद्धतीने हा सुकर मार्ग टिळक सुचवतात.आणि म्हणूनच याचा फार मोठ्ठा परिणाम पुढे झाला, ज्याबाबत खुद्द लोकमान्यांनीच त्यांच्या १९०७ सालच्या ‘स्वदेशी आणि बहिष्कार यांचा वाढदिवस’ या अग्रलेखात लिहिलय, ’नुकताच हिंदुस्थान सरकारच्या व्यापारी खात्याचा जो रिपोर्ट प्रसिद्ध झाला त्यात नोएल पॅटन असे लिहितात की, गेल्या साली हिंदुस्थानात परदेशी कापड दीड कोटी रुपयांचे कमी आले, इतकेच नव्हे तर, तंबाखू सिगरेट सारख्या परदेशी जिनसांची आयातही कमी होऊन अधिक किमतीची यंत्रे हिंदुस्थानात आली.स्वदेशी च्या वापराचा आणि बहिष्कार योगाच्या उपयुक्ततेबद्दल आणखी पुरावा तो काय ?’१९०५ साली टिळकांच्या विदेश निमित्त मुंबईला पुष्कळ फेऱ्या झाल्या.भुसावळ, येवले, लोणावळा, मिरज, कोल्हापूर येथे जाऊन त्यांनी स्वदेशीवर व्याख्याने दिली.

बहिष्कार ही गोष्ट पूर्वी फक्त धार्मिक व्यावाहारांमध्येच होती.एखादी व्यक्ती नियमबाह्य वागली किंवा काही गुन्हा केला तर त्या व्यक्तीला आणि व्यक्तीच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात येत असे.टिळकांनी त्याचे रुपांतर राष्ट्रीय बहिष्कारात केले.टिळक म्हणतात की आजच्या घडीला हे तंत्र धर्मातून बाजूला घेउन राष्ट्रीय व्यवहारात उपयोगात आणले पाहिजे.जे जे म्हणून विदेशी आहे आणि जे जे त्याज्य आहे ते समाजाने स्वयंप्रेरणेने बहिष्कृत केले पाहिजे.बहिष्काराची कल्पना सुरवातीला ब्रिटीश मालापुरतीच होती.१९०६ साली कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात राज्यकारभारावरही बहिष्कार घालावा अशी व्याख्या करण्यात आली.हेच निमित्त मिळाले आणि टिळकांनी याचाही प्रसार आपल्या व्याख्यानांमधून ठिकठीकाणी केला.१९०७ साली टिळकांनी केलेल्या तुफानी चळवळीचा मुख्य भाग होता तो म्हणजे दारूबंदी.दारूबंदीवर त्यांनी लेख लिहिले, व्याख्याने दिली, हे कमीच म्हणून थेट दारूच्या दुकानाबाहेर पहारे लावून लोकांना परावृत्त करण्यासाठी त्यांनी सुरवात केली.दारूबंदीचा हा प्रयोग बेळगाव, नगर अशा शहरांच्या ठिकाणी करण्यात आला पण तो प्रामुख्याने गाजला तो पुण्यात.टिळक म्हणत की भारतात दारू नव्हतीच असे नाही परंतु इंग्रजांनी येथे दारूचा खप वाढवला ज्यामुळे लोक त्याच्या जास्त आहारी गेले.याबाबत टिळक म्हणतात की दारू पिणाऱ्यास किंवा दारूस बहिष्कृत करावे पण भंग, गांजा, अफू या गोष्टी सुरु ठेवाव्यात का ? तर येथेही ते तंत्र उपयोगात आणावे.

वंगभांगाच्या वेळी पुण्यातील विद्यार्थ्यांची एक सभा भरली आणि कलकत्त्यास ज्याप्रमाणे विदेशी कापडाची होळी झाली तशीच पुण्यात करावी असा ठराव सभेत पास झाला.होळीला टिळक सुरवातीला अनुकूल नव्हते परंतु शिवरामपंत परांजपे हे विद्यार्थ्यांचे लाडके असल्यामुळे त्यांच्या संमतीने होळी पार पडली.या होळीचे सूत्रधार होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.मुलांचा उत्साह आणि आवेश पाहून लोकमान्यही यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी तेथे भाषणही केले.होते.नंतर अश्याहोळ्या बाबाराव सावरकरांच्या पुढाकाराने नाशिक आणि त्या परिसरात पेटतच गेली, जिची धग थेट इंग्लंडला जाणवली.

लोकमान्यांच्या मते, ‘ इंग्रजांनी हिंदुस्थान देश काबीज करण्यापूर्वी या देशातील लोक आपणास लागणारे कापड किंवा लोखंडी सामान येथल्या येथेच तयार करीत व या धंद्याच्या आधारावर लक्षवधी लोक येथे आपला उदरनिर्वाह चालवत.इंग्रज आल्यावर ही स्थिती बदलून,विलायती व्यापारी कामगार किंवा धंदेवाले यांच्या फायद्याकरिता राज्यकर्त्यांनी या देशातील उद्योगधंदे जाणीवपूर्वक बुडविले.’ ही गोष्ट अगदी सत्य होती, म्हणूनच टिळक स्वदेशी आणि बहिष्काराचा सतत उल्लेख करून जागृती करत होते.टिळकांची वाणी ही एवढी जबरदस्त प्रभावी होती की ऐकणारा किंवा वाचणारा सहज त्यांच्या जाळ्यात अडकत असे (अर्थातच चांगल्या अर्थाने). टिळक मुद्दामच आपल्या लेखांमधून अशी उदाहरणे देत की ज्यातून लोक सहज त्यांच्या सांगण्याचा स्वीकार करतील.टिळक लिहितात की, ‘अमेरिकेत ज्या वेळी बहिष्कार योग सुरु झाला तेव्हा त्याची थट्टा करणारे किंवा मुद्दाम परदेशी माल वापरणारे काही मूर्ख लोक नव्हते असेही नाही, पण अशा लोकांस समाजातून बहिष्कृत केले आणि आपले कार्य फळास जाईल असे यत्न सुरु ठेवले.’ ज्या वेळी टिळक स्वतः ही अशी थेट जागृती करणारी उदाहरणे देत त्या वेळी सहाजिकच लोकांच्या मनात कुठेतरी याबाबत जागृतीची एखादी मंद ज्योत पेट घेत असे.

मॅकोले एकदा मोठ्या प्रौढीने म्हणाला होता की, ‘ हिंदुस्थानातील लों स्वतंत्र होऊन त्यांचे स्वदेशी राजे विलायती तलवारी आणि विलायती पोशाख चढवून राज्य करू लागले तरी बेहेत्तर होईल’. यावर टिळक लिहितात की मॅकोले साहेबाच्या या खुबीदार विधानावर आमची स्वदेशी बावळटे आज फसलेली आहेत, त्याचमुळे ती स्वदेशी-बहिष्काराचा विरोध करत आहेत.

काँग्रेस च्या पुढाऱ्यांना स्वदेशी-बहिष्काराचा उपाय बंगालच्या फाळणीतील खळबळीने पुरवला.ब्रिटीश राज्याला शुद्धीवर  आणणारा हा उपाय आहे या जाणीवेने टिळकांनी तो मोठ्या आवेशाने उचलून धरला.बंगाल नंतर पुढे ही चळवळ महाराष्ट्रात आणि पुढे देशभर पसरली.याच प्रेरणेतून टिळकांनी १९०५ साली उभे केले ‘स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर’ या नावाचे स्वदेशी मालाच्या विक्रीला प्रोत्साहन देणारे दुकान....

©पुष्कराज घाटगे

Comments