लोकमान्य आणि सशस्त्र क्रांतिकारी चळवळ


         “इंग्रजांना आमच्या देशावर राज्य करावयाचे असल्यास ते त्यांनी खुशाल करोत. राज्यकर्त्यांविरुद्ध शस्त्र चालवण्याची आमची ताकद नाही आणि इच्छाही नाही.”
२२ ऑगस्ट १९०५ च्या केसरी मधील ‘राष्ट्रीय बहिष्कार’ या आग्रलेखामध्ये बहिष्कारासंबाधी टिळकांनी लिहिलेले प्रस्तुत वाक्य.यामध्ये टिळक म्हणतात की तुम्ही राज्य करू शकता परंतु आमचे हक्क आणि व्यापार/व्यवसाय या संबंधी असलेले अधिकार तरी आम्हाला असू देत. भले कोणत्याही संबंधी असो पण टिळकांसारख्या जहाल अश्या क्रांतिकारकाच्या लिखाणात वरील वाक्य वाचलं तर कोणाही व्यक्तीच्या भुवया स्वाभिविकच उंचावल्या जातात.परंतु १९९८ सालचा राजद्रोहाचा खटला आणि टिळकांचा स्वतःचा असलेला राज्यकारभाराचा आणि कायद्याचा अभ्यास बघता टिळकांची लेखनाची पद्धत ही अशीच असे. जनतेला इंग्रज सरकारच्या महत्वाच्या योजनांची माहिती करून द्यायची ज्यानुशांगाने जनता या बाबत शिक्षित होऊन आपले हक्क स्वतः मागून घेईल, दुसरीकडे याच जनतेच्या मनात सरकारविषयी क्षोभ निर्माण करणे हे काम चालू असे, तिसरीकडे आपले लेखन हे कायद्याच्या मर्यादेत ठेऊन तो गुन्हा ठरणार नाही आणि ठरेल अश्या सीमारेषेवर पाय ठेऊन लीत राहायचे, अश्या वेगवेगळ्या पातळीवर टिळक आपले वृत्तपत्र लेखनाचे काम करत असत. याच आदर्शातून पुढे शिवरामपंत परांजपे, काकासाहेब खाडीलकर यांच्यासारखे ‘अग्रलेख’क पुढे आले.
   
    टिळकांच्या मधील जहाल, कठोर असे व्य्क्तीमत्व सुरवातीपासून अधोरेखित होत होते. त्यांच्या महाविद्यालयीन जीवन चालू असतानाच वासुदेव बळवंत फडके यांच्या क्रांतिकारी उठावाच्या बातम्या पुण्यामध्ये आणि आसपासच्या ठिकाणी पसरत होत्या. या काळात रामोशी, भिल्ल समाजाला सोबत घेऊन उठाव करण्याची योजना आणि त्या प्रकारची पूर्व तयारी वासुदेव बळवंतांनी सुरु केली होती. राज्यकर्त्यांनी त्यांचा धसका घेतलेला होता.१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीश साम्राज्य अत्यंत बलिष्ठ झाले होते, अशा ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध उठाव करणार, बंड करून उठणारे वासुदेवराव पहिलेच होते. या उठावापुर्वी वासुदेव बळवंतांनी तरुणांना शस्त्रशिक्षण देण्याचे, कवायतीचे वर्ग छुप्या प्रकारे घेतले होते. तरुण्यातल्या प्रंचंड उत्साहामध्ये टिळकांनी या शस्त्रप्रशिक्षण वर्गामध्ये फडक्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले होता. परंतु टिळक होते पक्के गणिती, त्यांच्या मनामध्ये कायम पुढचे आडाखे तयार असत, त्यामुळे त्यांनी सहाजिकच फडक्यांना पुढचे प्रयोजन काय याविषयी चौकशी केली, फडक्यांनी त्या वेळी चालू गोष्टींवर भर दिलेला असल्यामुळे पक्की अशी योजना नसल्याचे सांगितले, त्यामुळे आपले काही येथे पटणार नाही असे म्हणून टिळकांनी यातून काढता पाय घेतला.

   त्यामुळे सशस्त्र क्रांतीसाठी त्यांच्या मनामध्ये कायमच एक अनुकूल मत होते, परंतु केवळ हिंसा किंवा समोरच्या व्यक्तीला मारून आणि स्वतः मरून आपले ध्येय साध्य करण्यापेक्षा चळवळीच्या रूपाने, आततायी मार्गाकडे न वळताही जहाल प्रकारे क्रांती करता येते असे टिळक मानत असत.म्हणूनच १९०६ साली नाशिक कटामध्ये ज्यात कलेक्टर जॅक्सन ला गोळ्या घातल्या गेल्या त्या पूर्वी टिळकांची आणि या कटवाल्यांची भेट झालेली होती. भलत्या साहसाने इष्टसिद्धी बाजूलाच राहील पण निष्कारण कोणतेही मोठे कार्य न करताच तुम्ही फाशी जाल व हे आयुष्य वाया जाईल, तुम्ही हा आतातायी विचार न सोडल्यास माझ्या मदतीची आणि सहानुभूतीची अपेक्षा करू नका असे कठोर शब्द टिळकांनी सुनावले. यामध्ये दोघांच्या म्हणजे टिळकांची आणि कटामध्ये सहभागी तरुणांची अश्या दोन्ही बाजू त्यांच्या त्यांच्या परीने योग्यच होत्या. आजच्या तरुणाने राष्ट्रोन्नतीसाठी चिरकाळ टिकेल असे काम न करता कमी वयात स्वतःचा जीव धोक्यात घालणे हे टिळकांसारख्या महत्वाकांक्षी व्यक्तीला मानवणण्यासारखे नव्हते. पण यावरून टिळक या तरुण क्रांतिकारकांच्या विरूद्धच होते अशी कोणी समजूत करून घेईल तर ते ही उचित ठरणार नाही. १८९७ साली प्लेग च्या निवारण समितीवर असलेल्या रँड याने जनतेवर बरेच जुलूम केले होते. याविषयीचा राग व्यक्त करण्यासाठी १२ जून १८९७ या दिवशी झालेल्या राज्याभिषेक उत्सवावेळी दामोदर हरी चापेकरांनी स्वरचित काव्य म्हणून त्यामध्ये समोर बसलेल्या पुढार्यांना षंढ म्हणून त्यांची निर्भत्सना केली. हे ऐकून लोकमान्य उठले आणि म्हणाले की दुसऱ्यांना षंढ म्हणण्याच्या अंगी पौरुष असतं तर रँड अजून जिवंत राहिला नसता. हेच बोल ऐकले आणि यातून स्फूर्ती घेउन २२ जून १८९७ या दिवशी चापेकर बंधूंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योजनापूर्वक रँडचा वध केला. त्यामुळे टिळक कोणत्याही एका विचारसरणीकडे झुकलेले नव्हते हे लक्षात येते.

ज्या कार्याने अपेक्षित अशी निश्चित ध्येयप्राप्ती होईल हे माहित असेल तरच टिळक अशा तरुण क्रांतीकारकांना पाठिंबा दर्शवत असत. यापैकी एक होते विनायक दामोदर सावरकर. सावरकरांच्या विदेशी कपड्यांच्या होळीपासून ते विदेशातील शिक्षण आणि क्रांतिकारक हालचालींना प्रत्येक वेळी टिळकांनी पाठिंबा दिला होता तो ही उघडपणे. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे ही असेच आशावादी क्रांतिकारक होते. मनामध्ये उच्च ध्येय घेऊन टिळकांची क्रांतीकार्यासंबंधी भेट घेतल्यावर टिळकांनी त्यांना अमेरिकेमध्ये जाऊन तेथे चळवळ उभी करून, तेथील क्रांतिकारी विचारांच्या व्यक्तींना संघटीत करून देशाबाहेर राहून देश स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला टिळकांनी दिला. यातूनच उदयाला आली खानखोजे, लाला हरदयाळ यांनी अमेरिकेमध्ये स्थापन केलेली ‘गदर पार्टी’ ! फितुरीमुळे गदर चे बंड अपयशी ठरले परंतु हा प्रयत्न भव्य प्रमाणात झाला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे. आणखी उदाहरण घ्यायचे तर ते म्हणजे केशव बळीराम हेडगेवार. शिक्षण चालू असताना डॉक्टर हेडगेवारांनी मुंबई येथे जावून लोकमान्यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. यातूनच त्यांनी कलकत्त्याला डॉक्टरकीचे शिक्षण घेता घेता ‘कोकेन’ हे टोपणनाव धारण करून क्रांतिकारक गटासोबत त्यांच्या कामांमध्ये सहभागही घेतला होता. याच डॉक्टर हेडगेवारांनी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. असे अगणित क्रांतिकारक होते ज्यांनी लोकमान्यांच्या मार्गदर्शनावरून मोठे ध्येय साध्य केले.

१८९२ साली काँग्रेसचे अधिवेशन सुरु असताना कलकत्त्यामध्ये टिळकांची भेट झाली राष्ट्रकार्याच्या इच्छेने मुलींची शाळा चालविणाऱ्या माताजींशी. या मुळच्या तंजावरच्या असून उत्तम मराठी बोलत असत. वैधव्य आल्यावर त्या नेपाळ मधील काठमांडू येथील पशुपतेश्वराच्या देवस्थानी गेल्या, तेथे त्या नेपाळ नरेश समशेर बहाद्दूर यांच्या संपर्कात त्या आल्या आणि काही काळानंतर कलकत्त्यात येउन स्थायिक झाल्या. टिळकांची नेपाळच्या नरेशांबरोबर ओळख करून देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. यानंतर टिळकांचे सहकारी वासुदेव गणेश उर्फ वासुकाका जोशी आणि काकासाहेब खाडिलकर यांची माताजींच्या मार्फत नेपाळ नरेशांशी ओळख झाली. खाडिलकरांनी तेथे एक कौलांचा कारखाना सुरु केला. परंतु त्यांच्यासोबत काठमांडू येथे काम करणाऱ्या दामू जोशी या इसमाने कोल्हापूर प्रकरणात अटक झाल्यावर नेपाळ मधील कार्य उघड केले आणि खाडिलकरांना आपली कल्पना सोडून द्यावी लागली. काही नेपाळी तरुणांना जपानमध्ये लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावे असे नेपाळच्या मुख्यमंत्र्यांच्या मनी ठासवून खुद्द वासुकाका जपानला गेले. कलकत्त्यातील एका जर्मन पेढीसोबत संधान बांधून गुप्तपणे बंदुकीच्या गोळ्या बनवण्याचे यंत्र हस्तगत केले.या सर्वाच्या मागे टिळक होते हे वेगळे सांगायला नको. हिंदुस्थानाशेजारील  चीन, नेपाळ, अफगाणिस्थान या देशांमधून ब्रिटीश कारभारावर दडपण आणून त्याचा फायदा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी करण्याचा टिळकांचा उद्देश होता. यासाठी आपल्या विश्वासातल्या ३ व्यक्ती त्यांनी एकेका देशात पाठविल्या. अफगाणीस्थानात पाठवलेल्या व्यक्तीला तेथे प्रवेशच न मिळाल्यामुळे ते फसले. चीनमध्ये दुसरं प्रयत्न केला गेला पण तेथेही अपयश आले. खाडिलकरांचे नेपाळ मधील प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. हे सर्व पाहता टिळकांचा दुर्दम्य आशावाद आणि प्रचंड खटपट आणि त्यासाठीचे धाडस नजरेत भरते.

  पांडुरंग महादेव अर्थात सेनापती बापट यांच्यामुळे बॉंब विद्या सर्वप्रथम भारतात आली १९०८ साली. रशियन क्रांतिकारक निकोलस सफ्रांस्की यांच्याकडून बापट बाँब बनविण्याची विद्या शिकले. त्याच्या निर्मितीची माहिती पुस्तिका मूळ रशियन भाषेमध्ये होती. बापटांनी त्या वेळी त्यांच्या प्रेमात असलेल्या अॅना या युवतीची मदत घेऊन तिच्याकडून त्या माहिती पुस्तिकेचा इंग्रजीत अनुवाद करून घेतला. याच्या बापटांनी वीस प्रती तयार केल्या. त्यातली एक होतीलाल वर्मा यांच्याकडे सुपूर्त केली. होतीलाल वर्मा टिळकांचा निरोप घेऊन बापटांना भेटले होते, टिळकांनी बाँब बनवण्याची कृती बापटांना मागितली होती. बापटांनी दिलेली बाँब  च्या कृतीच्या पुस्तिकेची प्रत घेऊन वर्मा थेट पुण्यास येऊन गायकवाड वाड्यात मुक्काम करून राहिले, त्या वेळी ती प्रत त्यांनी टिळकांच्या हवाली केली. या वेळी गोविंद पांडुरंग बापट या नावाचा तरुण बाँब बनवण्याच्या प्रयत्नात होता, टिळकांनी होतीलाल वर्मा आणि गोविंद बापट यांची १८ फेब्रुवारी १९०८ रोजी भेट घडवून आणली. नंतरच्या काळात बापट काही वर्षे भूमिगत राहून नंतर पुण्याला आले आणि त्यांना मराठा वृत्तपत्राचे सहसंपादक म्हणून टिळकांनी त्यांना नोकरीवर ठेवले. जळजळीत असे विचार असणाऱ्या बापटांना टिळक ‘धगधगते यज्ञकुंड’ म्हणत असत.ज्या नाशिक कटातील तरून क्रांतीकारकांची टिळकांनी हजेरी घेतली होती त्याच नाशिक कटामधुन सुटलेले वि. म. भट, राजद्रोहाची शिक्षा भोगलेले वा. म. जोशी यांनाही टिळकांनी केसरी-मराठा मध्ये आश्रय दिला होता. यातून आणखी एक गोष्ट दिसते की टिळक क्रांतिकारकांच्या केवळ पाठीशी उभे रहात नसत, तर गरजेच्या वेळी त्यांच्या मदतीलाही त्यांच्या पाठीशी असत.

   १७ फेब्रुवारी १९१७ रोजी पुण्यातील सभेत टिळकांनी, ‘आपखुशीने का होईना पण सैन्यात शिरा’ असे आवाहन केले. याबात सरकारलाही सांगितले की तुम्ही हिंदुस्थानकडे लष्करी भरतीची मागणी केली आहे तर आम्ही सैन्यात शिरू परंतु सरकारने आम्हाल राजकीय हक्कांचे आश्वासन द्यावे. याविषयी आणखी एक महत्वाची गोष्ट यांचनंतर महिन्याभराने घडून आली. २ मार्च रोजी सैन्यभरतीसंबंधी झालेल्या मुंबई येथील सभेत टिळकांनी सैन्यात शिरण्याचे आवाहन केले, तेव्हा नऊशे तरुणांनी सैन्यात शिरण्यास तयार आहोत म्हणून आपली नावे नोंदवली होती. १६ जून १९१८ रोजी टिळक आपल्या भाषणात म्हणाले की, ''
मी स्वतः पाच हजार सैनिक उभे करण्यास तयार आहे आणि जर ही संख्या पूर्ण करण्यास मी अपयशी ठरलो तर कमी पडणाऱ्या प्रत्येक सैनिकाबद्दल १० रुपये दंड भरण्याचीही माझी तयारी आहे”. जे नाहीये ते ओरबाडून घ्या आणि जे मिळतय ते जास्तीत जास्त मिळवत राहण्याचा प्रयत्न करा असं त्यांचं सांगणं असे.           असे होते लोकमान्य टिळक....!



संदर्भ-
लोकमान्य टिळक चरित्र - धनंजय कीर
लोकमान्य टिळक चरित्र - न र फाटक
लोकमान्य टिळकांचे निबंध - संपादक राम शेवाळकर
चापेकर पर्व - सच्चिदानंद शेवडे
सेनापती बापट - य दि फडके
खानखोजे - वीणा गव्हाणकर

©पुष्कराज घाटगे

Comments