लोकमान्य आणि लोकांची लोकमान्य भक्ती
“टिळक महाराज की जय !!!”
वरील घोषणा ही लोकमान्यांवरच्या भक्ती भावापोटीच आलेली आहे हे वेगळे सांगायला नको.लोकमान्य मंडालेहून सुटून आल्यानंतर म्हणजेच १९१४ नंतर जवळ जवळ ६ वर्षांनी ते लोकांच्या समोर आले होते. अर्थातच त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी ज्या ज्या काही भावना होत्या त्या अगदी उचंबळून आल्या होत्या. गायकवाड वाड्यात येऊन लोकमान्यांना डोळे भरून पाहून घेणे आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेणे हेच त्यानंतर कित्येक दिवस चालू होते. यानंतर लोकमान्य लोकांचे हिरो म्हणूनच जास्त वर आले आणि त्याच भक्तिभावातून प्रस्तुत घोषणा मोठ्या प्रमाणात पसरली.
सुरवातीच्या काळात केसरी आणि मराठा सुरु केल्यानंतर लगेचच कोल्हापूरच्या शिवाजी महाराजांचा छळ होत आहे या संदर्भात छापलेली माहिती आणि पुरावे खोटे ठरले त्यामुळे टिळक आणि आगरकर यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. याबाबत ची माहिती लोकांना होतीच परंतु छापलेले पुरावे आणि पत्रव्यवहार हे खोटे आणि यांना तुरुंगवास भोगावा लागला. आपल्या राजासाठी टिळक आणि आगरकर या दोन व्यक्ती तुरुंगात जाऊ शकतात हे पाहूनच लोकांच्या मनात टिळकांविषयी आपुलकी निर्माण झाली होती (सध्या टिळक हाच विषय असल्यामुळे फक्त टिळकांचा उल्लेख करत आहे). त्यानंतरच्या काळात टिळक हे राजकारणात शिरल्यानंतर, लोकांचे पुढारी झाल्यावर आणि प्रामुख्याने ते ‘लोकमान्य’ झाल्यानंतर लोकांचे त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि भक्तीभाव वाढतच गेला.
याचे उदाहरण म्हणजे लोकमान्यांना २२ जुलै १९०८ या दिवशी काळ्या पाण्याची शिक्षा झाल्याची बातमी पसरल्यानंतर कित्येक विद्यार्थी शाळेत गेले नाहीत, कित्येक दुकाने आणि कारखाने बंद होऊन जिकडे तिकडे सर्वत्र उदासीनता दिसून येऊ लागली. मुंबई येथील भायखळा, परळ आणि आसपास च्या भागातील गिरणी कामगार कामावर गेले नाहीत; व कामगार आणि पोलीस यांच्याय झटापटी झाल्या, बरेच लोक तर चवताळून जाऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडांचा वर्षाव केला, या वेळी पोलिसांनी गोळीबार केला ज्यात कित्येक जखमी झाले, तर काही मेले. अगदी सट्टा बाजारारखे कायमच चालू राहणारे बाजार बंद झाले, दुःखद प्रसंग असल्यामुळे लोक कामावर न जाता अस्वस्थपणे घरी स्वस्थ बसले.बरं हे कमी की काय, तर लोकांनी ‘सत्यभामेचा धावा’, ‘नमस्कार त्या बाळ गांगाधाराला’ अशा कविता लिहिल्या; बागलकोट येथे ‘टिळक संप्रदायी मठ’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले गेले. यातून लोकांची टिळकांबद्दलची आत्मीयता, प्रीती, भक्ती, पूज्यबुद्धी दिसून येते.
असाच एक प्रसंग आहे. भक्तीयोगावरचे गाढे अभ्यासक ल. रा. पांगारकर यांनी लोकमान्यांना भक्तीयोगावरच बोलायला म्हणून आमंत्रित केले होते. त्या वेळी लोकमान्यांच्या आधी पान्गारकरांचे अध्यक्षीय भाषण झाले, ज्यात त्यांनी हाच विषय संपूर्ण मांडला. एखाद्या विषयातल्या दिग्गज व्यक्तीने आपले बोलणे पूर्ण केल्यावर इतर जण त्यावर काय बोलणार ? परंतु पान्गारकरांचे भाषण झाल्यावर लोकमान्य आपले भाषण द्यायला उठले आणि त्यांनी पांगारकरांच्या भाषणात त्यांच्या बोलण्यातून निसटलेले मुद्दे घेऊन पांगारकरांच्याही पेक्षा सरस असे भाषण केले. त्यानंतर जेव्हा टिळक घरी जायला म्हणून बाहेर पडत होते तेव्हा त्यांनी बघितलं की आपले जोडे गायब आहेत. त्यांना तसेच अनवाणी घरी जावे लागले. दोन दिवसांनी त्यांना एक पत्र आणि पार्सल आले ज्यात लिहिले होते की, ‘त्या दिवशी तुमच्या भाषणामुळे मी इतका भारावून गेलो होतो की मी तुमचे जोडे घरी नेऊन माझ्या देवघरात पूजेमध्ये ठेवले आहेत. आत्ता या पत्रासोबत तुमच्यासाठी नवीन जोडे पाठवत आहे, तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमा असावी’. हाच तो भक्तीभाव...
लोकमान्यांना समाजामध्ये फक्त आदराचं स्थानच होतं असं नाही, तर लोकांनी त्यांना देवत्व बहाल केलेलं होता.याविषयीचा एक अजब असा प्रसंग आहे. १९१७ साली लोकमान्य हे प्रांतिक परिषदेसाठी नाशिक येथे जाणार होते.त्याच वेळी एक बाई आपल्या लहान मुलाला घेउन लोकमान्यांच्या पायावर त्याला ठेवण्यासाठी नाशिकहून पुण्याला जाण्याकरिता नाशिक स्टेशन वर आली होती. लोकमान्य स्वतः नाशिक ला येणार आहेत हे कळल्यावर तिला फार आनंद झाला आणि तिने आपली हकीकत लोकांना सांगितली. तिच्या मुलाचे डोके फिरलेले होते आणि तो वेड्यासारखा वागत होता, म्हणून तिने नवस केला होता की जर माझं मुलगा बरा झाला तर मी त्याला टिळक महाराजांच्या पायावर घालील. कालांतराने तिचा मुलगा बरा झाला आणि त्याचमुळे नवस फेडण्यासाठी ती बाई पुण्याला निघाली होती. तिचा ‘देव’ही त्याच वेळी येणार आहे हे ऐकून तिला आनंद झाला. तिला लोकांनी वेटिंग रूम मध्ये बसवलं. लोकमान्य नाशिक स्टेशनवर रेल्वेतून उतरताच लोकांनी त्या बाईला त्यांच्यासमोर हजर केले. आणि अखेर त्या बाईने आपल्या मुलाला टिळकांच्या पायावर ठेऊन आपला नवस फेडला. त्या वेळी दादासाहेब खापर्डे लोकमान्यांना म्हणाले, “आहो बळवंतराव, तुम्ही नवसास पावता हे आजच समजले आम्हाला !’’ लोकांनी देवत्व बहाल केलेला हा पहिलाच नेता असेल.
१९१८ साली टिळक विदर्भ दौऱ्यावर असतानाचा असाच एका खेडवळ व्यक्तीबाबत घडलेला हा प्रसंग. एके गावी मोटार थांबली होती. मोटारीच्या दुतर्फा लोक गर्दी करून भे होते. त्या गर्दीमधून एक वृद्ध व्यक्ती ओंजळीत काही घेऊन आला. लोकमान्यांच्या जवळ जाऊन म्हणाला, “महाराज, आमच्या खेड्यांतून जास्त काय होणार ? सर्वांनी मिळून हे गोळा केले आहे. मी ते आपल्यासमोर ठेवतो...भगवन् तुम्हाल उदंड औक्ष देवो !” असे म्हणताना त्या वृद्धाचा कंठ दाटून आला होता. त्यांने आपली ओंजळ लोकमान्यांच्या पायांजवळ ठेवली आणि मग ती टिळकांच्या एका सहकाऱ्याच्या हाती रिकामी केली; ज्यामध्ये काही आणे, चौल्या पावल्या, थोडे रुपये असा ऐवज होता...या ओंजळीतला हा खजिना लोकमान्यांना लाखो रूपयांपेक्षा बहुमोल वाटला. म्हणूनच तर ते नेहमी म्हणत “ मला लोकांची अंतःकरणे हवीत, पैसे नकोत”. यातूनच ही भक्ती निर्माण झाली असल्यास नवल ते काय ?
याच वर्हाड दौर्याच्या वेळचा प्रसंग खापर्डे यांनी लिहून ठेवला आहे. मोटार एका मुक्कामाहून दुसऱ्या मुक्कामी जात असेल तर वाटेत दिवसरात्र न बघता खेड्यातील लोक हातात फुले, माळा, पानसुपारी घेउन रस्त्यांवर हजर असत.याप्रमाणे लोक आठ आठ तास उन्हातान्हात लोकमान्यांच्या मोटारीची वाट बघत उभे रहात असत.मोटार आली की लोक मोटार आडवण्यासाठी मोटारीसमोर उभे रहात. मोटार थांबली की फक्त लोकमान्यांच्या अंगाला हात लावण्याचा साधा प्रयत्न करण्यात सर्व असत. कित्येकांनी मोटारीला हात लाऊनच दर्शन घेतले, तर काहींनी मोटारीवर साचलेली धूळ कपाळी लावली. त्या वयात लोकमान्यांचा पाय दुखत असे म्हणून ते काही वेळा गाडीतून उतरत नसत. ‘त्यांचा पाय दुखतो आहे, पायाला हात लाऊ नका’ असे सांगण्यात सहकाऱ्यांचा बराच वेळ जात असे.तरीही एकदा एका गावात लोकांना खोटे वाटत असेल म्हणून टिळकांनी पायावरचे धोतर वर करून पायाला बांधलेली पट्टी पाय वर करून दाखवली. याचा परिणाम असा झाला की एका गृहस्थाने तोच लोकमान्यांनी वर उचललेला पाय धरून ठेवला आणि त्यामुळे बाकीच्यांना व्यवस्थित हात लाऊन ‘दर्शन’ घेणे आणखीनच सोयीचे झाले. त्यानंतर असे ठरले की लोकांनी हाताचेच ‘दर्शन’ हात लाऊन घेणे जास्त चांगले. याच वेळी तेथील स्त्रीया येऊन मोठ्या भक्तीभावाने टिळकांना तुपाच्या दिव्यांनी ओवाळून ताटात पैसे टाकत असत. नंतर लोकमान्यांना हार घालून त्यांच्यावर फुले उधळण्यात येत असत आणि ‘लोकमान्य टिळक महाराज की जय’ अश्या गर्जना केल्या जात.
अशात मग बर्याचदा आगगाडीचा प्रवास कष्टाचा म्हणून टिळक मोटारीने फिरत. कित्येक ठिकाणी रस्ता सपाट नसे, वाटेत डोंगराळ भाग, त्यात पुन्हा नद्यांवर पूल नाही अशी स्थिती असे. यावर उपाय म्हणून लोकांनी जिथे पूल नाही तेथे वाळूची पोती नदीच्या पात्रात रचून गाडीला जाण्यायोग्य रस्ता तयार केला.
२५ डिसेंबर १९१६ साली टिळक लखनौ काँग्रेस साठी आगगाडीतून प्रवास करून त्या दिवशी दुपारी लखनौ ला पोहोचले. गाडीची वाट पहात गर्दी थांबली होती. ‘भगवान टिळक’ अशा प्रचंड जयघोषात त्यांचे स्वागत झाले. गर्दीमुळे तेथील पुढारी टिळकांना मोटारीतून घेउन जात होते. तेव्हा एका तरुणाने वाटेत येउन गाडी थांबवली आणि मग त्याचे मित्रही आले आणि गाडीसमोर आडवे झाले. त्यांनी गाडीतील लोकांना सांगितले की एकतर आम्हाला टिळकांची मिरवणूक काढू द्या किंवा ही मोटार गाडी आमच्या अंगावरून घेऊन जा. त्यांनी शेवटी लोकमान्यांना गाडीतून उतरायला भाग पाडले आणि त्यांची मिरवणूक एका घोडागाडीतून निघाली. या तरुणांनी गाडीचे घोडे काढले आणि त्या ठिकाणी स्वतःला जुंपले आणि गाडी स्वहातांनी ओढत नेली. हे धाडसी कृत्य करणारा मुख्य तरूण होता, नंतरचे महान क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल !
१९१९ मध्ये एकदा चिकोडीहून निपाणी येथे नेण्यात आले. त्यावेळी तेथे ‘महात्मा भगवान टिळक’ असा आपला उल्लेख करण्यापासून त्यांनी लोकांना रोखले. ते म्हणाले की हे फॅड आधी थांबवा, मी जे तुम्हाला सांगतो त्यात अलौकिक असे काही नाही आहे.
टिळकांच्या निधनानंतर त्याच वर्षी १९२० साली नागपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनावेळी लोकमान्यांचे प्रचंड असे चित्र लावण्यात आले होते, ज्यामध्ये भारतीय जनतेचे त्यांच्यावरील प्रेम, भक्ती दिसून येत होती. त्या चित्रात त्यांना चार हात दाखवण्यात आले होते. त्या हातांमध्ये टिळकांनी शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केले होते.
लोकांच्या मनात लोकमान्यांबद्दल किती उच्च कोटीचा भक्तीभाव आणि आदर होता हे या उदाहरणांमधून दिसून येते....
संदर्भ-
लोकमान्य टिळक चरित्र - धनंजय कीर
लोमान्य टिळक चरित्र - न र फाटक
लो. टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका- संपादक स वि बापट
लो. टिळक यांची गेली आठ वर्षे - आप्पाजी विष्णू कुलकर्णी
पुष्कराज घाटगे
Comments
Post a Comment