पर्यायी जीव अर्थात क्लोन



    ५ जुलै १९९६ साल.तिचा जन्म झाला आणि सर्वत्र खळबळ उडाली.ती कोणी साधी सुधी मेंढी नव्हती,ती 'डॉली' होती.डॉली हे नाव ऐकताच आजही कित्येक संशोधकांच्या भुवया उंचावतात कारण ती क्लोन होती.क्लोनिंग चा पहिला वहिला प्रयोग यशस्वी झाला होता.डॉ आयन विल्मुट आणि सहकार्यांनी मिळून हे शिवधनुष्य पेललं होतं.

  डॉली च्या जन्माची घोषणा झाली आणि समाजातील सर्व स्तरातून त्यावर टिका आणि विरोध दर्शवण्यात येऊ लागला.इतर सर्वच धर्मानप्रमाणे ख्रिश्चन धर्मगुरुही तितकेच प्रचंड कट्टर,व्हॅटिकन ने हे असले अनैतिक चाळे ख्रिश्चन धर्माला मान्य नाहीत असे जाहिर केले.हे झालं धर्माबद्दल,पण शास्त्रीय वर्तुळातही प्रखर विरोध झाला,त्याला कारणही तसच होतं.डॉली या क्लोन चा जन्म होण्यापूर्वी विल्मुट यांचे श्रम ४३४ वेळा वाया गेले होते.यात जन्माला आले जीव जन्मतः मरत असे किंवा मेलेलेच जन्माला येई. यातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे यातले 50% वेळा वाढ झालेले गर्भ इतक्या विकृत पद्धतीने जन्माला येत की त्यांना मारून टाकावेच लागले.यानंतर डॉली जन्माला आली.

  चालत्या फिरत्या जीवाचे क्लोनिंग जरी तेव्हा नवीन असले तरी वनस्पतींच्या क्लोनिंगची ओळख बऱ्यापैकी सर्वांना होती.याही पूर्वी १९५२ मध्ये बेडकाचे आणि ८३ साली उंदराचे क्लोनिंग झाले होते पण ते प्रायोगिक तत्वावर जे फारसे जाहीर केले गेले नव्हते.मादीच्या शरीरातील कोणतीही पेशी सजीव निर्मितीची क्षमता का गमावते या विषयावर स्पेमान नावाचा संशोधक संशोधन करीत होता गेल्या शतकाच्या सुरवातीच्या काळात.तेव्हा वेगवेगळ्या अवस्थेतील वेगळ्या पेशींची केंद्रे,कार्यक्षम नसलेल्या पेशी केंद्रांच्या जागी बसवण्याची कल्पना स्पेमान याला सूचली,हीच या क्लोनिंग पद्धतीची सुरवात होती !
लैंगिक पुनरुत्पादन ही सजीवांची मुलभुत गरज आहे.याचसाठी सर्व प्रकारचे सजीव नर-मादी असे एकमेकांकडे आकर्षित होतात,प्रेम वगैरे गोष्टींचे अखेरचे लक्ष्य हे आपली विण वाढवणे हेच असते(निसर्गाच्या दृष्टीने).म्हणूनच निसर्गाने आपल्याला लैंगिक पुनरुत्पादनाची प्रक्रिया बहाल केली आहे.निसर्ग स्वतः क्लोनिंग जाणत नव्हता किंवा नाही,ही कल्पनाच मुळात मानवाची.अकार्यक्षम गोष्ट कार्यक्षम बनवणे ही तर आपली पूर्वापार चालत आलेली हौस आणि त्यातूनच क्लोनिंग चा जन्म झाला.एखादा सजीव जर मुल जन्माला घालण्यास सक्षम नसेल तर त्याची पेशी रचना बदलून त्याला सक्षम करणे म्हणजे क्लोनिंग.
  
 क्लोनिंग करण्यासाठी कार्यक्षम मादीचं एक बीजांड घेतलं जातं.त्याचे केंद्र बाहेर काढले जाते,ज्यासोबत त्याचा बीजांडात असलेले डीएनए सुद्धा त्या केंद्रासोबत बाहेर येतात.मग ज्याचा क्लोन करायचा त्याच्या त्वचेची एक पेशी घेतली जाते.ती पेशी आणि ते बीजांड जवळ ठेवले जातात आणि एक सूक्ष्म विद्युत् प्रवाह सोडून त्याचे एकत्रीकरण केले जाते.त्यातून मग त्या केंद्रविरहित असलेल्या बीजांडाला नवीन केंद्र मिळते जे अर्थातच कारक्षम असते.हे बीजांड गर्भाशयात रोवले जाते,त्यानंतर नैसर्गिकरित्या त्याची वाढ होते आणि क्लोन जन्मास येतो !

 मानवी क्लोन जरी आजपर्यंत निर्माण झाला नसला तरी असे होऊ शकते अशी घोषणा संशोधकांनी केली आहे.यात बरेच धोके दिसून येत आहेत.कदाचित डॉलीच्या आधी जन्मलेल्या जीवांसारखे विकृत मानव जन्माला येऊ शकतात किंवा जन्माला येताच मरुही शकतात.ज्या संशोधनाची पूर्ण खात्री देता येत नाही अशा पद्धतीचे हे संशोधन मानले जाते.अमेरिकेने क्लोनिंग बाबतच्या शासकीय अनुदानावर कोणत्याही संशोधनास बंदी घातली आहे,विनाअनुदानित संशोधनावर मात्र बंदी नाही.मुख्य म्हणजे क्लोनिंग चे संशोधन अनियंत्रित असल्यामुळे त्याचे फायद्यांपेक्षा धोके अधिक दिसून येतात.

 जीवशास्त्र,समाजशास्त्र अशा अघाड्यांवर क्लोन ला विरोधच आहे.पण तसे काही फायदेही आहेत क्लोनिंग चे, जसे की औषधी किंवा सात्विक दूध देणाऱ्या गायी निर्माण करणे, उपयुक्त पेशींचा वापर अवयव रोपणासाठी करणे इत्यादी.

  एक गोष्ट मात्र जरा वेगळी घडली आहे.डॉली ज्या मूळ मेंढी पासून तयार झाली ती ६ वर्षांची होती,त्यानंतर जेव्हा डॉलीच्या पेशींचा अभ्यास केला तेव्हा नवजात डॉलीच्या पेशींचे वय हे ६ वर्षे दिसत होते.याचाच अर्थ भले त्याचा जन्म कधीही होवो,शारीरिक दृष्टया त्याचे वय मूळ प्राण्याचे वयाएवढेच असणार...
संशोधकांचे,जे विरोधात आहेत त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत प्रण्यांवरचे प्रयोग पूर्णपणे यशस्वी होणार नाहीत तोपर्यंत मानवी क्लोन वर घसरू नये. त्यांचेही बरोबरच आहे.

भविष्यात क्लोन किती फायद्याचे किंवा किती घातक ठरेल ते काळच ठरवेल...

#विज्ञानेतिहास
#इतिहासाच्या_पाऊलखुणा
#सफर_विज्ञानविश्वाची

©पुष्कराज घाटगे

Comments