लोकमान्यांची मांडालेतील ज्ञानसाधना

   

       लोकमान्य टिळक हे नाव आठवलं की डोळ्यासमोर येते ती त्यांची भव्यतम अशी कारकीर्द ज्यामध्ये फार मोठ्या गोष्टी सामावल्या आहेत. त्यामध्ये मग टिळक आणि मित्रसमुहाने सुरु केलेले न्यू इंग्लिश स्कूल, केसरी-मराठा ही वृत्तपत्रे, राजकारण, स्वदेशी चळवळ इत्यादी. पण या इत्यादी मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे टिळकांवरचे तीन वेळा भरले गेलेले राजद्रोहाचे खटले. यातील दुसरा खटला हा महत्वाचा ज्यामध्ये त्यांना ६ वर्षांचा तुरुंगवास आणि हद्दपारी भोगावे लागले होते.हा दुसरा राजद्रोहाचा खटला मोठा रोमांचक ठरला, ज्याने टिळकांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. केसरीमध्ये आधी चापेकरांनी लिहिलेली कविता छापली गेली हे निमित्त ठरलं आणि मग लिहिले गेलेले दोन अग्रलेख हे गुन्ह्याचे कारण ठरले. यामध्ये दादासाहेब करंदीकर, दादासाहेब खापर्डे, जोसेफ बाप्टीस्टा आणि गांधी हे टिळकांना खटल्याच्या कामी सहाय्यक म्हणून काम बघत होते. जवळपास सलग नऊ दिवस खटल्याचे का, चालले आणि २२ जुलै १९०८ च्या रात्री न्यायमूर्ती दिनशा दावर यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन ४०२ खाली टिळकांची सक्तमजुरीची शिक्षा कमी करून त्या जागी सध्या कैदेची शिक्षा दिली गेली.
     तुरुंगवास हा एखाद्या कैद्यासाठी, तो कोणीही व्यक्ती असला तरी हे एक फार मोठं बंधन असतं. भलेभले लोक सुरवातील खचतात, एकांतात घालवतात, कुणाशी फारसं बोलत नाहीत, पण लोकमान्यांसारख्या व्यक्तीची गोष्टच निराळी होती. त्यांनी एकदा एक विधान केलं होतं की ‘ पारतंत्र्यात असताना समाजात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी दिवसरात्र सतत वाचत बसणं, लिखाण करणं, चिंतन करणं हे आपण मोकळे असताना करण्याच्या गोष्टी नाहीत, हा काळ देशासाठी काही करण्याचा असतो, जेव्हा आपण तुरुंगवासात असतो त्या वेळी इच्छा असली तरी बाकी सामाजिक गोष्टी करता येत नाहीत, हा तुरुंगातला काळ जास्तीत जास्त वाचन, लेखन, चिंतन यासाठी योग्य असतो.’ हेच त्यांनी केलं. सप्टेंबर मध्ये टिळकांना आधी मुंबई आणि मग तेथून बोटीने २३ सप्टेंबर रोजी रंगून मार्गे मंडालेला आणले गेले.
 त्यानंतर लगेचच ३ ऑक्टोबर त्यांनी पुण्याला त्यांचे भाचे धोंडोपंत विद्वांस यांना पत्र पाठवून काही गोष्टी पाठवण्यास सांगितल्या. यामध्ये २८ पुस्तकांची यादी आणि सोबत इतर दैनंदिन वापरातील वस्तूंची यादी होती. यातली बहुतांशी पुस्तके ही तत्वज्ञान विषयक तर होतीच, त्यासोबत भगवद्गीतेवरील भाष्ये, मॅक्समुलर चे ऋग्वेद, उपनिषदांवचे खंड, संस्कृत-जर्मन डिक्शनरी,जर्मन-इंग्लिश डिक्शनरी इत्यादी पुस्तकं होती. बरं नुसती पुस्तकं पाठवा असं सांगून थांबले नाहीत तर त्यापुढे सूचना केली आहे की ‘समुद्राच्या किंवा पावसाच्या पाण्यात भिजू नयेत म्हणून पुस्तकं आणि बाकी वस्तू एका मेणकापडात गुंडाळून मग पेटीत खालून पाठवून द्यावे, सर्व वस्तू व्यवस्थित पोहोचतील याची काळजी घ्यावी.’ मंडाले तुरुंगाचा नियमच असा होता की कोटीही राकीय बातमी तुरुंगात येणार नाही आणि येणाऱ्या पत्रांमध्ये कुठेही राजकारणाचा उल्लेख असणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली जात असे. इंग्रजी सोडल्यास कोणत्याही भारतीय भाषेतील पुस्तकाला तेथे परवानगी नव्हती, त्याचा प्रत्यय टिळकांना लगेचच आला. पुस्तके मागवल्यानंतर पुढच्याच महिन्यात पाठवलेल्या पत्रात ते लिहितात की, ‘ गीता, ब्रह्मसूत्रे,उपनिषद यांची पुस्तके मला मिळाली नाहीत, त्यांच्या नावांच्या पानांचे भाषांतर करून घेतल्यावरच ती मिळतील.’ अशीच काही पुस्तकं तिथल्या व्यवस्थेने अडवली कारण पुस्तके भारतीय भाषेमध्ये होती. असाच प्रकार पत्रांबाबत, शिक्षेच्या सहा वर्षांमध्ये सर्व पत्रे आधी तपासली जाऊन मगच ती टिळकांपर्यंत पोहोचत. एखाद्या पत्रात एखादी ओळ जरी सामाजिक/राजकीय बाबतीत असेल तरी ती खोडून मगच पत्र टिळकांना मिळत असे. या सर्वांमध्ये त्याचं लक्ष आपल्या पुण्यातील घरातल्या लायब्ररीकडे होतंच. १ मे १९०९ च्या पत्रात त्यांनी धोंडोपंतांना विचारलंय की, ‘मी सांगितल्याप्रमाणे पुस्तके चांगल्या अवस्थेत असतीलच, एक एक करून पुस्तके लांबवली जाणार नाहीत हे पहावे’. नंतरही एका पत्रात त्यांनी सांगितलं आहे की कुणीही एखादा विश्वासू व्यक्ती असेल तरी त्याला पुस्तक देताना एखादी अट घालून द्यावी. एखादं पुस्तक मागवल्यानंतर ते सापडत नसल्यास ते का सापडत नाही ह्याचाही जाब विचारत असत.
  या तुरुंगवासात विदेशी लेखकांनी लिहिलेली तत्त्वज्ञापर पुस्तकं वाचण्यावर टिळकांनी जास्त भर दिलेला दिसतो. जर्मन तत्वज्ञ इमन्युअल कान्ट याच्या पॉजीटीव पॉलिटी चे चार खंड, त्याचेच क्रिटिक ऑफ प्युअर रीझन हे प्रसिद्ध पुस्तक, बातलर्स वर्क चे दोन खंड, लेस्ली स्टीफन्स चे सायन्स ऑफ एथिक्स हे पुस्तक, हिस्टोरीयंस हिस्टरी ऑफ द वर्ल्ड चे  खंड मागवून घेतेल ज्यातले पाच खंड अगदी २ महिन्यात वाचून पूर्ण केले. जीनसीवाल्यांच्या लायब्ररीतून ११ उपनिषदे त्वरित पाठवण्याचा आदेश ५ मार्च १९०९ च्या पत्रात केलेला आढळतो. कान्ट याच्या पॉजीटीव पॉलिटी चे खंड मिळत नाहीत म्हणून लंडनला गेलेल्या दादासाहेब करंदीकर यांना पाठवलेल्या पत्रात हे खंड पाठवण्याची विनंती केल्याचं दिसतं.पुण्यात रामचंद्र गोविंद या इंग्रजी पुस्तकांच्या विक्रेत्याकडे जी परदेशी पुस्तकं मिळत नाहीत ती इंग्लंडहून मागवून घेऊन, ती थेट मांडलेला पाठवण्याची सूचना केली आहे. ३ जुलै च्या पत्रात नवी २८ पुस्तके मागवली, ज्यात स्पेन्सर ची सोशालॉजी,मिल्टन,ह्युमचे निबंध, अशी कित्येक इंग्रजी पुस्तके तर होतीच पण त्यासोबत तुकारामाची गाथा, दासबोध आणि बायबल सुद्धा मागवले होते. विविध देशांची सखोल माहिती मिळवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन स्टोरी ऑफ नेशन्स चे ७ खंड मागवले. काही पुस्तके घरी मिळत नसतील तर ती इतर स्नेहीजनांकडून किंवा  काही महिन्यांकरिता मागवल्याचेही दिसते.
  टिळकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यासाठी दादासाहेब करंदीकर आणि दादासाहेब खापर्डे दोघेही स्वतंत्रपणे लंडनमध्ये प्रयत्न करत होते. ३० जुलै १९०९ च्या पत्रात टिळकांनी करंदीकरांना जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकण्याचं ठरवलं आहे हा विचार सांगितला. शिक्षकाशिवाय जर्मन फ्रेंच शिकण्यासाठी आवश्यक पुस्तके पुण्यात ज्या दुकानात मिळतील त्या दुकानाची माहिती देऊन, पुस्तके त्याच्याकडून विकत घेऊन पाठवायला सांगितली.  फ्रेंच प्रायमर, ज्याचे उच्चार मराठीत दिलेले असतील असं पुस्तक रामचंद्र गोविंद कडून मागवण्यास सांगितले. १३ ऑगस्ट १९०९ ला दादासाहेबांना पत्रात सांगितले की ते लंडन मध्ये राहतात त्या भागात ह्युगोज इंसटीट्युट आहे तिथे परदेशी भाषा शिकवल्या जातात, त्यांच्याकडे जर्मन, फ्रेंच भाषांचे प्रायमर्स मिळाले तर पाठवण्यास सांगितलं. ह्युगोज ने छापलेली फ्रेंच ग्रामर ची प्राथमिक पुस्तकं लंडनहून पाठवण्यासाठी दादासाहेबांना सांगून जास्तीत जास्त सर्व बाजूंनी आपल्याकडून ह्या भाषा कशा पक्क्या होतील हेच ते बघत होते.संस्कृत/इंग्रजी/फ्रेंच’जर्मन डिक्शनरी मागवून त्यातून शब्दांचे अर्थ लाऊन भाषा आत्मसाद करण्याचे कसब त्यांनी लवकरच आत्मसाद केले. हे सर्व मागवून टिळकांनी जोरदार अब्यास करून ५ ते ६ महिन्यात जर्मन आणि फ्रेंच चा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला. ३ मे १९१० च्या पत्रात ते धोंडोपंतांना लिहितात की, ‘ मी आता जर्मन वाचायला शिकलो आहे त्यामुळे आता मला प्राथमिक व्याकरणाची पुस्तके नकोत, मोठे व्याकरणाचे पुस्तक लागेल आणि इतरही काही पुस्तकं लागतील ती रामचंद्र गोविंद यांच्याकडून घेऊन आणि काही इंग्लंडहून मागवून घेऊन पाठव, पुस्तके शक्य तितक्या लवकर हवी आहेत’ नवनवीन शिकण्याची प्रचंड धडाडी आपल्याला यातून दिसून येते. त्यानंतर फ्रेंच जर्मन ची पुस्तके येतच राहिली, २० ऑक्टोबर ला ४ जर्मन पुस्तके भाषांतरासह टिळकांना मंडालेमध्ये पोस्टाने मिळाली. या कालखंडात टिळकांनी रामचंद्र गोविंद अँड सन्स यांच्याकडून कित्येक पुस्तकं मागवली, नसतील तर त्याला लंडनहून मागवायला सांगितली पण हवं ते पुस्तक मिळवण्यासाठी मंडालेहूनही प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी खुपदा वेबरचे इंडिअन नक्षत्राज हे पुस्तक मागवूनही, ते बऱ्याच दिवसांनी मिळाले. हे जर्मन पुस्तक वाचण्याची त्यांची इच्छा एवढी होती की पुस्तक मिळाल्यानंतर त्यांनी ते तासाला पाच पाने ह्या वेगाने वाचून अगदी कमी कालावधीत वाचून पूर्ण केले आणि ते पुस्तक आपल्याला समजलं ह्याचाच त्यांना जास्त आनंद झाला.
   हे करत असताना ते फक्त तत्वज्ञान वाचून थांबले नाहीत तर इतरही विषयांकडे वळले. रामानुज यांची गीतेवरील टीका,श्रीधरची गीतेवरील टीका,तेलंगांनी केलेलं गीतेचं इंग्रजी भाषांतर(सेक्रेड बुक्स ऑफ द इस्ट ही त्यावरील पूर्ण मालिका),यासोबत ड्यूसन्स ने लिहिलेले उपनिशादांवरील खंड मागवले होतेच. या पुस्तकांमधून त्यांचा गीतेबद्द्लच्या अभ्यासाचा पाया जास्त मजबूत होत होता. ३ जानेवारी १९११ ला हिंदुस्थानी प्राचीन विद्येसंबंधी कागदपत्रे, काही जर्मन पत्रके पाठवण्याबद्दल सांगितलं, ही पत्रे घरच्या लायब्ररीत कुठे मिळतील हे सविस्तर सांगितलं.
  लोकमान्यांना खगोलशास्त्राची आवड होती हे सगळ्यांनाच माहित आहे. मग ही आवड ते मांडलेमध्ये जोपासणार नाहीत असं कसं होईल ? ३ जानेवारी १९१२ च्या पत्रात त्यांनी खगोलशास्त्रावर आधारित पुस्तकं मागवली. बेंटलचे हिंदू अॅस्ट्रोनॉमी, कोल्ब्रूकचे एसेज, खगोलशास्त्रावरील मॅक्स मुलर, व्हीटली, जॅकोबी यांची पुस्तके, मोडकांचे वेदांग ज्योतिष, शं, बा. दीक्षित यांचे भारतीय ज्योतिषशास्त्र, हर्शेलचे आउटलाईन्स ऑफ अॅस्ट्रोनॉमी, अ शॉर्ट हिस्टरी ऑफ अॅस्ट्रोनॉमी अशी खागोल्शास्त्रावरची एकापेक्षा एक पुस्तकं मागवून त्यांचा अभ्यास केला. नित्शेचे ४ ग्रंथ,श्रोडरचे बुद्धीजम हे जर्मन पुस्तक, मॅक्डोनल्ड चे वेदिक माय्थोलॉजी ही पुस्तकं ३ नोव्हेंबर १९१३ च्या पत्रातून मागवली. पाली भाषेतील ज्ञान घ्यावं हे ही डोक्यात आलं आणि त्यातली महावंस सारखी काही पुस्तकंही मागवली. सुटकेपूर्वी काही महिनेही त्यांनी आपली मागणी चालूच ठेवली होती. ५ मार्च १९१४ च्या पत्रातून नारद पंचतंत्र हे संस्कृत पुस्तक, buddha and christus हे जर्मन पुस्तक, तसच ख्रिस्तावरचं एक फ्रेंच पुस्तकही मागवलं होतं. ही अशी कित्येक पुस्तकं मागवून, वाचून, चिंतन करून १९११ साली लोकमान्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ पूर्ण केला.
 १९१४ साली सुटका होण्यापूर्वी काही महिने टिळकांनी आपली सर्व पुस्तके रजिस्टर बुक पोस्टाने हप्त्या हप्त्याने व्यवस्थित पाठवण्याची व्यवस्था केली होती. वर दिलेली पुस्तकांची नावं ही अनेक पुस्तकांपैकी अगदी थोडी आहेत, शेकडो पुस्तकं घरात कोणत्या कपाटात आहेत, नसतील तर ती कोणत्या दुकानात मिळतील, तिथेही नसतील तर बाहेर कोणत्या लायब्ररीमध्ये मिळू शकतील ह्याचं पुरेपूर ज्ञान आणि प्रचंड ज्ञान टिळकांच्या डोक्यात होतं. तुरुंगवासात राहूनही सतत नवनवीन शिण्याची जिद्द, तीही वयाच्या पान्नाशीमध्ये, ही गोष्टच अजब आहे.६ वर्षांच्या तुरुंगवासात राहून ढिगाने पुस्तकं वाचून, २ नव्या भाषा शिकून, नवं ज्ञान मिळवून, ते लक्षात ठेवणं ही काही छोटी गोष्ट नाही. लोकमान्यांची महानता यातूनच दिसून येते. या प्रकारच्या वाचनाच्या छंदाचा, ज्ञानग्रहणाचा, अंश जरी आपण घेण्याचा प्रयत्न केला तरी आपण नक्कीच काही मोठं साध्य करू शकतो.

संदर्भ-
लोकमान्य- न. र. फाटक
लोकमान्य टिळकांची पत्रे- केसरी प्रकाशन

Comments