त्या राष्ट्रप्रेमी संशोधकाची गोष्ट- भाग २

भाग २

 स्वामी विवेकानंदांचे पॅरिस येथे भरलेल्या परिषदेत भाषण चालू होतं आणि तेवढ्यात जगदीशचंद्रांचं नाव पुकारलं गेलं, आपल्या या स्वदेशीय आणि त्यातही बंगाली बंधूचं नाव ऐकून स्वामीजी प्रचंड आनंदित झाले, अभिमानाने त्यांनी आपल्या भाषणात जगदीशचंद्रांचा गौरव केला. विवेकानंद म्हणाले, "या सगळ्यांमध्ये हा एकटा तरुण पदार्थविज्ञानवेत्ता उठून दिसत आहे. विज चमकून प्रकाश उजळावा त्याप्रमाणे त्याने पाश्चात्त्यांना भारून टाकले आहे. आज जगदीशचंद्र बोस हे सगळ्या पदार्थवैज्ञानिकांचे मुकुटमणी बनले आहेत. एक भारतीय ! एक बंगाली ! शाब्बास रे वीरपुत्रा ! " विवेकानंदांचा उर त्या वेळी अत्यंत अभिमानाने भरून आला होता.विवेकानंद नेहमी बसुंचा उल्लेख 'बंगालचा अभिमान आणि गौरव' असा करत असत. नंतरच्या काळात अगदी शेवटच्या श्वासापर्यंत भगिनी निवेदिता जगदीशचंद्र आणि त्यांच्या पत्नी अबलादेवी यांच्यासोबत होत्या. त्या जगदिशचंद्रांनी नवनवी शिखरे कशाप्रकारे पादाक्रांत केली ह्याबद्दल भगिनी निवेदिता नेहमीच विवेकानंदांना पत्राद्वारे कळवत असत.
 या परिषदेत बसुंनी आपलं संशोधन मांडलं, जे सर्वच उपस्थितांना आश्चर्यकारक ठरलं. परिषदेतल्या व्याख्यानामुळे शास्त्रीय जगतात आणि एकूणच यूरोपमध्ये जगदीशचंद्रांना बरीच प्रसिद्धी मिळाली.

  यानंतर त्यांनी एक महत्वाचा प्रयोग केला. सजीव आणि निर्जीव यांच्यावर झालेल्या प्रयोगांच्या निष्कर्षावरून त्यांनी वनस्पतींवर प्रयोग करायचं ठरवलं. सजीव आणि निर्जीव यांच्या विद्युत् प्रतिसादात जर साधर्म्य असेल तर यांमध्ये असणाऱ्या वनस्पतींचा प्रतिसाद काय असेल असा विचार जगदीशचंद्रांनी केला. त्यांनी विविध प्रकारच्या भाज्या वापरून त्या विविध रसायनांना कसा प्रतिसाद देतात ते बघितलं.आणि असं दिसून आलं की या रसायनांमुळे भाज्याही उत्तेजित झाल्या, जास्त विष दिल्यामुळे मेल्या,कमी विष दिल्यावर कमी उत्तेजित झ्याल्या आणि  दारु पाजल्यावर झिंगल्या सुद्धा !
  आता पुन्हा ते मागे फिरले आणि असा प्रयोग धातुंवर केका तर तिथे असं आढळलं की विषारी रसायनांचा असा वापर धातुंवर केला तर मिळणारा प्रतिसाद हा प्राण्यांच्या स्नायुंसारखा आणि वसनस्पतींसारखाच होता. त्यांनी कथिल, जस्त, प्लॅटीनम अशा धातुंवर केलेल्या प्रयोगांचा आलेख हा स्नायूंच्या प्रतिसादाच्या आलेखासारखा मिळाला होता. आता ही मुख्य गोष्ट, हा मोठा शोध त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीसमोर मांडावे असा सल्ला त्यांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ मायकेल फॉस्टर यांनी दिला. तो त्यांनी मानला, काही अडथळे येथे आलेही, पण फॉस्टर यांना हे संशोधन एवढं भावलं होतं की त्यांनी आपलं संशोधक म्हणून असलेलं वजन वापरून जगदीशचंद्रांना मोकळी वाट करून दिली.
 जगदीशचंद्र तेथील प्रत्येक बाब रविंद्रनाथांना कळवत होते। त्यांनी एका पत्रात म्हटलं की, ' इथले शास्त्रज्ञ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्या शाखांना वेगळं मानतात. पण विज्ञानासमोर ह्या शाखा एकच आहेत आणि हेच मी सिद्ध करू इच्छितो. इथले ख्रिस्ती शास्त्रज्ञ मानवी जीवनाला सर्वोच्च मानतात, स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि त्यामुळे सजीवांची पातळी वरची आहे असं दाखवतात पण मला हे सर्वांना दाखवून द्यायचय की सजीव-निजीव हे एकाच पातळीवर आहे, फक्त व्यक्त होण्यात फरक आहे. रॉयल सोसायटी च्या व्याख्यानात हेच मी दाखवून देणार आहे'.

प्रस्तुत व्याख्यानापूर्वी काही मिनिटं बिनतारी संदेशवहन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा कोट्यधीश मालक बसूंना भेटला. त्यांनी बसूंना बिनतारी बाबतच्या संशोधनाचं पेटंट घेण्याची विनंती केली परंतू बसूंनी नकार दिला. त्याने समजवण्याचा प्रयत्न केला की फार मोठ्या पैशांवर तुम्ही लाथ मारताय, यातील व्यावसायिक उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्याची निम्मी रक्कम मी तुम्हाला देतो, असंही तो म्हणाला पण जगदीशबाबूंनी साफ नकार दिला.
बसूंनी रविंद्रनाथांना पत्राद्वारे सांगितलं की, 'तो कोट्यधीश असलेला कंपनीचा मालक माझ्यासमोर भिकारी झाला होता, विनवित होता. पण मी नकार दिला. ह्या देशातले लोक पैशांसाठी हपापले आहेत, मी पण जर या जाळ्यात अडकलो तर यातून माझी सुटका होणार नाही.मी माझ्या राष्ट्राशी प्रतारणा करू इच्छित नाही.'  संशोधनासाठी फक्त सरस्वतीची उपासना करणाऱ्या बसूंनी लक्ष्मीला नाकारलं आणि पुढे म्हणूनच लक्ष्मीे गरजेवेळी बसुंकडे चालत आली.

 १० मे १९०१ या दिवशीच्या त्या व्याख्यानाचा विषय होता- 'द रिस्पॉन्स ऑफ़ इनऑर्गेनिक मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल स्टिम्युलस'.
 त्या व्याख्यानात त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांची सुंदर गुंफण करून, यांमधली एकता प्रयोगातून सहजपणे दाखवून दिली. त्यांनी स्वतः तयार केलेलं 'आर्टिफिशियल रेटिना' किंवा कृत्रिम डोळा हे उपकरण सर्वांसमोर सादर करून निर्जीवांच्या संवेदना समोर बसलेल्या सजीवांना दाखवून दिल्या. विषामुळे धातुला होणाऱ्या वेदनाही दिसल्या आणि तारेला पिळ दिल्यावर म्हणजे मेकॅनिकल अर्थात यांत्रिक उत्तेजनेमुळे त्या तारेने म्हणजे धातूने दिलेला प्रतिसादही दिसला.
 या व्याख्यानाच्या शेवटी बसू म्हणाले की', 'सजीव आणि निजीव यांच्यात हे अविश्वसनीय असं साधर्म्य आहे. तेव्हा इथे आपण भौतिक, जैविक, रासायनिक यांच्यामध्ये भेदाची अशी कोणती सीमा आखू शकतो ? अशी विभाजन रेषा अस्तित्वात नाही. यातून मला वैश्विक एकत्वाची जाणीव झाली जेव्हा हे निष्कर्ष मी प्रथम बघितले. सर्वाच्या मुळाशी असलेल्या एकत्वा चं दर्शन मला झालं आणि आमच्या भारतातल्या पूर्वजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे हे वैश्विक एकतेचं शाश्वत सत्य मला उमजलेलं आहे'.शेवट त्यांनी उनिषदातल्या मंत्राने केला !

 स्वतः ला शास्त्रज्ञ म्हणवणाऱ्यांनी याला 'अवैज्ञानिक' म्हणून विरोध केला. द्वैतामध्ये हरवलेल्या या समाजाला अद्वैत तत्वज्ञान सांगणारे जगदीशचंद्र बोस हे चुकीचे वाटत होते. ही बाब भलेही आध्यात्मिक होती पण ती बसूंनी शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करण्याचं महत्वाचं पाऊल टाकलं होतं. पण ह्याला पश्चात्यांनी कुठेही किंमत दिली नाही. बसूंचं हे भाषण जेव्हा रॉयल सोसायटी ने छापलं तेव्हा बसूंचे एकत्वाबाबतचे व्याख्यातले अखेरचे शब्द आणि औपनिषदिय मंत्र हे गाळलेलं आढळलं. आधीच बसू हे एका गुलाम देशाचे रहिवासी, त्यातही त्या देशातल्या अध्यात्माची, तत्वज्ञानाची सांगड ते विज्ञानातील महत्वाच्या प्रयोगाशी घालत आहेत ही कल्पना यूरोपियनांना अशक्य होती.

पण भव्यता ही कधीही लपून रहात नाही. जगाने त्यांचं संशोधन मान्य केलच ! एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका मध्ये बसूंच्या अद्वितीय संशोधनाबद्दल विस्तृत लिखाण केलं गेलं.
१९१७ साली त्यांना 'सर' हा किताब दिला गेला..!


©पुष्कराज घाटगे

Comments

Post a Comment