नोबेल विजेता मार्कोनी- नायक की खलनायक ? (भाग १)
रेडिओचा जनक आणि प्रामुख्याने बिनतारी संदेश यंत्रणेसाठी ज्याला नोबेल पुरस्कार मिळाला म्हणून जगभर ज्याचा गेली जवळपास दीडशे वर्षं उदो उदो होतो, तो महान वैज्ञानिक म्हणजे गुग्लिएल्मो मार्कोनी !
१७ मे १९०१ या दिवशी जगदीशचंद्र बसू यांचं लंडनच्या रॉयल सोसायटी पुढे व्याख्यान झालं. त्यात त्यांनी त्यांचं वनस्पती आणि निर्जीव यांमध्ये असलेल्या संवेदनांबाबत त्यांनी केलेलं संशोधन प्रयोगासह सविस्तर मांडलं, जे पाहून बड्या बड्या संशोधकांनी तोंडात बोटं घातली. त्यावेळी त्यांनी 'कृत्रिम डोळा(artificial retina)' तयार केला होता त्यावरचं प्रात्यक्षिक सादर केलं. वेगवेगळ्या प्रकरच्या विद्युतचुंबकीय लहरी हा डोळा कसा ग्रहण करतो हे त्यांनी दाखवून दिलं. बिनतारी संदेशवहन क्षेत्रात पुढे जी मोठी क्रांती झाली त्याचा पाया या ठिकाणी घातला गेला. जगदीशचंद्रांना एक सवय होती की ते व्याख्यान देताना नेहमी आपल्या संशोधनासंबंधीत मुद्दे असलेला कागद किंवा वही समोर ठेवत असत, तशीच त्यांनी एक वही रॉयल सोसायटीतल्या व्याख्यानावेळीही समोर ठेवली होती.
व्याख्यान झाल्यावर सामान्यतः वक्त्याभोवती समोरील व्यक्तींची गर्दी होते त्याचप्रकारे समोर बसलेले संशोधक आणि विद्यार्थी मंडळींचा बसूंभोवती गराडा पडला, प्रत्येकाशी बोलण्यात बराच वेळ गेला आणि शेवटी बसू मोकळे झाले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांची वही, ज्यात त्यांच्या वनस्पतींबाबत, निर्जीवांच्या संवेदनांबाबतच्या अभ्यासाची सर्व माहिती होती तशीच त्या वहीत त्यांनी बिनतारी संदेश यंत्रणेवर केलेल्या संशोधनाची महत्वाची टिपणंही होती, ती वही काही मिनिटांपूर्वी समोरच्या टेबलावर त्यांनी संदर्भासाठी ठेवली होती, ती आता तिथे नव्हती, अर्थातच त्या गर्दीत संधी साधून कोणीतरी ती लंपास केली होती. त्यावेळी काही व्यावसायिक बसूंना भेटायला आले होते ज्यांना बिनतारी संदेश यंत्रणेत पैसा गुंतवण्यात रस होता आणि जगदीशचंद्रांनी संशोधन व्यवसाय म्हणून करायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी त्या व्यावसायिकांना आपलं संशोधन(भलेही त्यावर त्यांचं पेटंट नव्हतं तरी) नकार दिला. आणि परिणामतः वही चोरीला गेली.
जवळपास ३-४ वर्षे प्रचंड श्रमातून बसूंनी तो संदेश ग्राहक कृत्रिम डोळा शोधला होता. पहिला प्रयोग त्यांनी त्याचा १८९८ साली केला होता. त्याचप्रमाणे ह्याचा मूळ प्रयोग १८९५ साली त्यांनी केला होता.त्याच काळात गुग्लिएल्मो मार्कोनी नावाचा इटालियन संशोधकही बिनतारी संदेश ग्राहकावर संशोधन करत होता. परंतु दोघांच्याही संशोधनाची दिशा आणि दशा वेगळी होती. एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या ह्या दोन संशोधकांची मुलाखत १८९७ साली प्रसिद्ध झाली होती, त्यावेळी ह्या होतकरू तरुणाचं बसूंनी कौतुक केलं होतं.
मार्कोनी ला हवा तसाच संदेश ग्राहक बसूंनी बनवला होता. बसूंनी थोडी वाकलेली नळी ह्या डोळ्यामध्ये म्हणजेच संदेश ग्राहकात वापरली होती, त्यात बदल करून मार्कोनी ह्याने फक्त सरळ नळी वापरली आणि संदेध ग्राहकाच्या क्षमतेत वाढ केली. लागलीच 'स्वतः' चं संशोधन नोंदवून त्याचे व्यापारी मालकी हक्क स्वतःकडे घेतले आणि त्याचं जाहीर प्रात्यक्षिक करून यश मिळवलं.
आणि पूढे त्याने रेडिओ लहरी प्रक्षेपित करून रेडिओचा जनक म्हणून नावही कमावलं.
मार्कोनी हा नक्कीच रेडिओचा आणि रेडिओ लहरींच्या प्रक्षेपणावर केलेल्या संशोधनाचा संशोधक होता पण ह्याचा अर्थ असा होत नाही की त्याने मूळ संशोधकांचं संशोधन त्याला न विचारता वापरून, त्याचं श्रेय लाटून, स्वतःच्या नावावर खपवावं. अर्थातच त्याने ते रूढार्थाने चोरलं नव्हतं कारण एखादी गोष्ट चोरी कोणाची होते जी त्या व्यक्तीच्या मालकीची असते त्याच्याकडून चोरी होते, बिनतारी च्या संशोधनाची हक्क बसूंच्या नावावर नव्हतेच, त्यामुळे ते चोरलं असं न म्हणता न विचारता वापरलं अस आपण नक्कीच म्हणून शकतो. किमान आपण ज्या संशोधकाच्या संशोधनाचा वापर केला त्यांचा उल्लेख करण्याची कृतज्ञता दाखवण्याचीही गरज त्याला भासली नाही.
मार्कोनीने बिनतारी चा प्रयोग केला त्यावेळी बसू इंग्लंड मध्येच होते त्यामुळे त्याच्या त्या ऐतिहासिक प्रयोगाबद्दल त्यांना नक्कीच समजलं असणार पण आपलं संशोधन हे समाजासाठी आहे असं मानणाऱ्या बसूंनी आपलं संशोधन समाजाला अर्पण केलं होतं. आपलं संशधन हे अप्रत्यक्षपणे वापरलं गेलं हे, बसू जगाला ओरडून सांगू शकले असते परंतु सर्व दिसत असूनही ते शांत राहिले. आणि भारताला या विषयासाठी मिळू शकणारी जागतिक ओळख कल्पनेतच राहिली. जगदीशचंद्रांची कामगिरी जगासाठी अज्ञातच राहिली. या बिनतारी संदेश वहनाच्या संशोधनाबद्दल गुग्लिएल्मो मार्कोनी याला नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...
क्रमशः
©पुष्कराज घाटगे
संदर्भ:
१)जगदीशचंद्र बसू- दिलीप कुलकर्णी
२) प्रकाशवेध- डॉ. माधवी ठाकुरदेसाई
३)तंत्रज्ञ जिनियस- अच्युत गोडबोले/दीपा देशमुख
पुष्कराज, छान लिहिलंस!
ReplyDeleteअसच लिहीत जा...👍👍
हो, नक्कीच👍👍
Deleteखूप छान
ReplyDelete