नोबेल विजेता मार्कोनो- नायक की खलनायक ? (भाग २)


*टेस्ला आणि मार्कोनी*

   गुग्लिएल्मो मार्कोनी याचा जन्म २५ एप्रिल १८७४ उभा दिवशी झाला.लहानपणापासूनच तो अबोल असल्यामुळे फारसा कुणाशी संबंधित रहात नसे. पण इतरांप्रमाणे विन्मुख असूनही तो अभ्यासात प्रगती करत होता, असंही नाही. त्याने समुद्रप्रेमामुळे नेव्हीत जायच्या उद्देशाने नेव्हल अकॅडमी ची परीक्षा दिली त्यात नापास झाला. बोलोना विद्यापीठात शिक्षण घेत असताना मॅट्रिक च्या परीक्षेतही नापास झाला आणि विद्यापीठाने 'यु आर स्टुपिड' असा शेरा देऊन त्याला काढून टाकलं होतं. पण अवांतर वाचनातून मार्कोनीला रेडिओ लहरींच्या प्रक्षेपणाबाबत कुतूहल निर्माण झालं होतं त्यामुळे त्याने त्यावर प्रयोग करण्यात स्वतःला गुंतवून घेतलं. आधी सांगितल्याप्रमाणे बरेच झोल करून, जुगाड करून मार्कोनीने रेडिओ संदेश ग्राहक बनवण्यात यश तर मिळवळच पण इंग्लंडमध्ये त्याबे केलेला बिनतारी(wireless) संदेश वहनाचा प्रयोग फार मोठ्या प्रमाणात गाजला. रेडीओ ट्युनिंग करण्याची पद्धत त्याने शोधून काढली आणि सुस्पष्टपणे रेडिओ संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली.  यातला व्यावहारिक भाग ओळखून त्याने 'मार्कोनीज वायरलेस टेलिग्राफ कंपनी'ची स्थापना केली. आणि लहानपणापासून श्रीमंत घरात वाढलेला मार्कोनी रेडिओमुळे आणि त्याच्या कंपनीमुळे बराच नफा कमवू लागला.

   १८६४ साली मॅक्सवेलने सर्वप्रथम रेडिओ लहरींचं अस्तित्व दाखवून दिलं. त्यामुळे त्याला या क्षेत्राचा जनक म्हणता येईल. त्यानंतर हेन्रीक हर्ट्झ ने यात मोठं काम केलं आणि मग हळूहळू अनेक संशोधकांनी यात उडी घेतली. त्यापैकी महत्वाचा होता एडवर्ड ब्रॅनली ज्याने रेडिओ लहरी शोधणारा पहिला डिटेक्टर बनवला.

   निकोला टेस्ला हा संशोधन असाच सर्व ठिकाणी 'परिपूर्ण' लुडबुड करणारा होता. त्याने भरपूर नव्या गोष्टी शोधल्या आणि अलिप्त राहिला. १८८५ साली हर्ट्झ ने जर्मनीमध्ये वायरलेस ट्रान्समिशन चा यशस्वी प्रयोग केला होता, त्यानंतर काहीच वर्षांनी १८९२ साली टेस्ला ने रेडिओ ची कल्पना मांडून त्यावर काम सुरू केलं (त्यावेळी मार्कोनी जेमतेम १८ वर्षांचा होता). त्यात टेस्ला ने एवढी प्रगती केली की १९०० साली त्याने न्यूयॉर्क मधील लॉंग आयलँड येथे वार्डनक्लिफ टॉवर उभारला जो मोठ्या प्रमाणात रेडिओ लहरी प्रक्षेपित करू शकत होता. हा टॉवर त्याने उभारला खरा पण मुळातच फारसा लोकांमध्ये न मिसळणारा टेस्ला या वेळी प्रसिद्धीपासून दूर राहिला. अर्थात नंतर या टॉवर ला प्रसिद्धी मिळाली आणि त्याला आता 'टेस्ला टॉवर' असंही म्हटलं जातं. यातून रेडिओ क्षेत्रामधलं टेस्लाचं भरीव योगदान दिसून येतं.

  त्यानंतर पुढच्याच वर्षी मार्कोनीने आपल्या प्रयोगाची मोठी प्रसिद्धी करून, रेडिओ ट्रान्समिशन बाबतच सर्व हक्क स्वतःच्या नावे करून घेतले म्हणजे रेडिओचं पेटंट मिळवलं. ह्यात टेस्लाचा कुठेही उल्लेख नव्हता. खरंतर रेडिओमध्ये वापरला जाणारा 'टेस्ला रॉड' हा टेस्लानेच तयार केला होता. यावरचे सर्व अधिकृत पेटंट मार्कोनीच्या नावावर असल्यामुळे त्याने याचा लगोलग व्यापारी उपयोग सुरू केला. रेडिओ क्षेत्राबाबत म्हणायचं तर मार्कोनीचं योगदान हे केवळ तांत्रिक बाबींमधलंच आहे असं म्हणता येईल कारण त्याने टेस्ला, हर्ट्झ, जगदीशचंद्र बोस इत्यादींच्या कल्पना परस्पर उचलून त्याचा उपयोग स्वतःच्या प्रयोगात करून, त्याची उपयोगिता वाढवून पेटंट मिळवलं. यातून त्याच्यातला पक्का उद्योजक दिसतो.

    समांतरपणे मार्कोनी आणि टेस्ला यांनी रेडिओचा शोध लावला आणि श्रेय मिळालं मार्कोनीला, कारण टेस्लाला स्वतःचा शत्रू समजणाऱ्या एडिसन चा वरदहस्त मार्कोनीच्या डोक्यावर होता. टॉवरच्या बांधणीपूर्वी १९०० साली जे पी मॉर्गन यांनी भेटून टेस्ला ने त्याची वायरलेस ब्रॉडकास्टिंग केंद्र स्थापण्याची इच्छा बोलून दाखवली. पण त्याच वेळी दुसरीकडे मार्कोनीने वायरलेसच्या माध्यमातून सिग्नल प्रक्षेपित करून दाखवला. हे बघून, मार्कोनीने आपल्या १७ पेटंट्सचा उपयोग केला असल्याचं टेस्लाने जगाला ओरडून सांगितलं पण कोणीही त्यावर विश्वास ठेवला नाही, कारण त्यावेळी 'हवा' फक्त मार्कोनीची होती. हे बघून मॉर्गनने टेस्लाच्या प्रकल्पनात गुंतवणूक करायला नकार दिला आणि मॉर्गनने मार्कोनीकडे पैसे गुंतवले. मार्कोनी प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर होता. १९०४ साली यूएस पेटंट ऑफिस ने रेडिओ ट्रान्समिशन चे सर्व हक्क मार्कोनीला दिले. टेस्लाने स्वतःच्या बुद्धिमत्तेवर मिळवलेलं सर्व मार्कोनीच्या नावावर गेलं आणि मुख्य म्हणजे ती १७ पेटंट, जी टेस्ला च्या नावे होती, तीही मार्कोनीला मिळाली. हे सर्व बघून टेस्ला हताश झाला. भावनेच्या भरात त्याने कोर्टात मार्कोनीविरुद्ध दावा केला पण तिथेही तो हरला, कारण पुरावे होते कुठे ? होतं ते सगळंच मार्कोनीच्या नावावर. टेस्ला शेवटी हरला होता.

सुरवातीला एडिसनने टेस्लाला त्रास दिला आणि शेवटी मार्कोनीने त्याला हरवलं. महत्वाची गोष्ट म्हणजे एकेकाळी मार्कोनी हा टेस्लाचा विद्यार्थी होता.

पण टेस्ला च्या नशिबी मृत्यूपश्चात एक खूप मोठी गोष्ट होती. मार्कोनीचा मृत्यू १९३४ साली झाला आणि टेस्लाचा १९४३ साली. टेस्लाच्या मृत्यूनंतर ठीक ६ महिन्यांनी कोर्टाने मार्कोनीची रेडिओ संबंधी सर्व पेटंट्स अवैध ठरवून ती टेस्लाच्या नावे केली पण हे बघायला टेस्ला त्या वेळी या जगात नव्हता.

समाप्त:

©पुष्कराज घाटगे

संदर्भ-
१) तंत्रज्ञ जिनियस भाग १-अच्युत गोडबोले/दीपा देशमुख
२)तंत्रज्ञ जिनियस भाग २-अच्युत गोडबोले/दीपा देशमुख
३)Tesla, Man out of time- Margaret Chaney
४) Nuts and Volts- Louis E. Frenzel


Comments