बाळ गंगाधर टिळक ते बळवंतराव टिळक



         *केशव गंगाधर टिळक ते बळवंतराव टिळक*

      त्या वेळी १८५७ च्या स्वातंत्र्य समराला वर्ष बाकी होते.रत्नागिरी मधले प्रसिद्ध असे संस्कृत पंडित,हुशार शिक्षक म्हणजेच श्री.गंगाधरपंत टिळक यांचे घर आनंदाने भारलेले होते.आणि अशातच १८५६ साली जुलई महिन्याच्या २३ तारखेला चिखलगावी एका केसरीने ‘ट्याहा’ केले.पार्वतीबाई यांच्या उपवासांना,व्रतवैकाल्यांना फळ यश आले.पण या मुलाच्या जन्मानंतर काही काळाने पार्वतीबाईंचे निधन झाले.वडिलांनी स्वतःच्या आजोबांच्या म्हणजेच नवजात मुलाच्या पणजोबांच्या नावावरून मुलाचे नामकरण ‘केशव’असे केले.लक्ष्मी-केशव या कुलदेवतेच्या नावाचाही येथे संदर्भ येतो.या केशवरावांचे म्हणजेच नवजात मुलाच्या पणजोबांचे वडील हे पानिपतावर लढल्याचे संदर्भही इतिहास देतो.१८१८ साली पेशवाई खालसा झाल्यावर स्वपराक्रमाने दाभोळजवळच्या अंजनवेल येथे मामलतदार असलेले केशवराव,सर्व पदभार सोडून रत्नागिरीत येउन स्थायिक झाले.गंगाधरपंत टिळकही काही कमी हुशार नव्हते.रत्नागिरी आणि नंतर पुण्यामध्ये गणित,संस्कृत,ज्योतिषशास्त्र याचे प्रचंड गाढे असे अभ्यासक म्हणून त्यांना फार मान होता.या अशा विद्वान माणसाच्या,परंपरागत पराक्रम,हुशारी असलेल्या घरात जन्माला आले ते केशव अर्थात बाळ गंगाधर टिळक.
     
      लहानपणापासूनच प्रगल्भ बुद्धिमत्ता.प्रत्येक गोष्टीत काहीतरी  उच्चतम करण्याची हातोटी.गंगाधरपंतांनी या सोन्याला बहुमुल्यता प्राप्त करून दिली.आपल्या मुलाला आपल्याप्रमाणेच संस्कृत भाषेची गोडी लागावी म्हणून गंगाधरपंत छोट्या बाळला एका संस्कृत श्लोकासाठी एक पै अशी किंमत मोजून श्लोक पाठ करवून घेतले आणि बाळ सुद्धा पै जमवत गेला तो थांबलाच नाही.या संस्कृतच्या संस्काराचा भविष्यात टिळकांना बराच फायदा झाला.
   
      बालपणापासूनच बाळ  वाद घालण्यात पटाईत होते.एकदा शिक्षकांनी फळ्यावर ‘संत’ हा शब्द योजलेले काही वाक्य लिहिली.तोच शब्द टिळक महाशयांनी वहीमध्ये संत हा शब्द सन्त,संत आणि सन् त अशा तीन प्रकारे लिहिला.हे तिन्ही प्रकारे लिहिलेले अर्थातच बरोबर होते.पण शिक्षकांनी इतर दोन चूक ठरवून फक्त ‘संत’ हा शब्द बरोबर दिला.पण हटवादी टिळक ऐकेनात.हा वाद हेडमास्तरांपर्यंत गेला,तेव्हा कुठे हा वाद मिटला.लहानपणी ही हुशारी सर्वत्रच दिसून येत होती.इंग्रजी शाळेत प्रवेश घेईपर्यंत अंकगणित,बीजगणित,युक्लिडची भूमितीची २ पुस्तके यांची संपूर्ण तयारी झाली होती.पुण्यातल्या सिटी स्कूल मध्ये त्यांनी २ वर्षात ३ इयत्ता पूर्ण केल्या.अशीच हुशारी दाखवत टिळक मॅट्रीक झाले.
     
     मधल्या काळात वडिलांचेही निधन झाले.त्यामुळे मोठ्या झालेल्या ‘बळवंतराव टिळक’ यांची जबाबदारी त्यांचे काका गोविंदपंत टिळक यांच्यावर आली.मृत्युपूर्वी वडिलांनी मुलाच्या नावे ५ हजार रुपये,रत्नागिरीमध्ये थोडी जमीन आणि गोविन्द्पंतांच्या नावे ३ हजार रुपये ठेवले होते.पं आश्चर्य हे की दोघांनीही या पैशांचा स्वतः साठी कुठेही उपयोग केला नाही.टिळकांनी स्वतःच्या नावे असलेल्या जमिनीचा स्वतःसाठी काहीही उपयोग न करता त्या जमिनीची गावाला जाउन इतरांच्या नावे व्यवस्था लावून दिली होती.गोविंदपंतांनी शेवटपर्यंत बळवंतरावाची जबाबदारी सर्वथैव पार पाडली.बळवंतराव टिळकांनी B.A साठी पुण्यात डेक्कन कोलेजात प्रवेश घेतला.याच कॉलेजमधून पुढे बळवंतराव टिळक खऱ्या अर्थाने घडत गेले.
                      ---------------------------------

Comments